भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधीजींसोबतच भगवान श्रीगणेश आणि देवी लक्ष्मीचा फोटो लावण्याची मागणी AAP चे अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. त्यामुळे गुजरात निवडणुकीपूर्वी (Gujarat Elections) अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी हिंदुत्वाचे कार्ड खेळल्याची चर्चा आहे. नोटांवर एका बाजूला गांधीजींचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मी गणेशजींचा फोटो असेल तर संपूर्ण देशाला त्यांचा आशीर्वाद मिळेल आणि आपली अर्थव्यवस्था रूळावर येईल, असे 'लॉजिक' केजरीवाल यांनी मांडले. केजरीवालांच्या या विधानावरुन आता काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत यांनी केजरीवालांविरुद्ध संताप व्यक्त केला आहे.
डॉ. नितीन राऊत यांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करताना धर्माची नशा विकण्याचं काम केजरीवाल करत असल्याचे म्हटले. केजरीवाल आणि मोदींमध्ये फारसा फरक नाही, असेही ते म्हणाले. तसेच, देशातील चलनी नोटांवर महात्मा गांधींसोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो छापण्याची मागणी केली. तसेच, बाबासाहेबांचा फोटो का नाही, असा थेट सवाल त्यांनी विचारला आहे.
अरविंद केजरीवाल ज्या शाळांचे ब्रँडींग करतात, त्या शाळेत त्यांनी जायलाही हवं. थोडा अभ्यासही करायला हवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींच्या सिद्धांतांना समजून घ्यायला हवं. मग, धर्मांची नशा विकण्याची गरज पडणार नाही. धर्माची नशा करणारे हे नेते मूर्ख नसून चालाख आहेत. केजरीवाल अन् मोदींमध्ये काही खास फरक नाही. दोघेही संविधानविरोधी आणि धार्मिक रुपाने पाखंडी आहेत. धार्मिक अफीमची ठेकेदारी करणारे अरविंद केजरीवाल असोत, RSS किंवा बीजेपी असो, हे नेहमीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा आणि महात्मा गांधींच्या सिद्धांताचा अवमान करतात, असेही राऊत यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले होते केजरीवाल
"देवी लक्ष्मीला समृद्धीची देवी मानले जाते. त्याचबरोबर भगवान श्रीगणेश सर्व अडथळे दूर करतात, ते विघ्नहर्ता आहेत. त्यामुळे या दोघांच्या फोटोंचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. यामुळे आपली अर्थव्यवस्था सुधारेल. आम्ही सर्व नोटा बदला असे सांगत नाही, पण किमान नवीन नोटा छापल्या जातात त्यावर ही सुरुवात केली जाऊ शकते आणि हळूहळू नवीन नोटा चलनात येतील."