‘छोटू’ प्रकरणाचा मोठा धमाका, पराभवाचे खापर नितीन राऊत यांच्यावर फुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2021 10:26 AM2021-12-26T10:26:20+5:302021-12-26T10:37:03+5:30
राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना अ. भा. अनुसूचित जाती विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हटविण्यात आले आहे. माहितीनुसार, याप्रकरणी क्रीडामंत्री सुनील केदार यांच्यासह आणखी काही नेत्यांवरही कारवाई होण्याचे संकेत आहेत.
नागपूर : विधान परिषदेच्या निवडणुकीत संघ मुख्यालय असलेल्या नागपुरात झालेला पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागला आहे. काँग्रेस हायकमांडने याची गंभीर दखल घेत पहिली कारवाई केली आहे. राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना अ. भा. अनुसूचित जाती विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हटविण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी क्रीडामंत्री सुनील केदार यांच्यासह आणखी काही नेत्यांवरही कारवाई होण्याचे संकेत आहेत.
नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत भाजपकडून आयात केलेले छोटू भोयर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. मात्र, क्रीडा मंत्री सुनील केदार व ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या आग्रहामुळे ऐनवेळी भोयर यांना बदलून अपक्ष मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. या सर्व घोळात काँग्रेसचा दारुण पराभव झाला व राज्यभर हसू झाले. याची गंभीर दखल घेत हायकमांडने २१ डिसेंबर रोजी राऊत, केदार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिल्लीत बोलावून घेतले होते. यावेळी या तिन्ही नेत्यांना समज देण्यात आली होती. या घटनाक्रमानंतर पक्षाकडून कारवाई होईल, असे संकेत मिळाले होते.
यानंतर शनिवारी रात्री अ. भा. अनुसूचित जाती विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी लिलोथिया यांची नियुक्ती केली जात असल्याचे पत्र अ. भा. काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले. एवढेच नव्हे तर या आघाडीचे समन्वयक म्हणून के. राजू यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या फेरबदलामुळे काँग्रेसमधील राजकीय वातावरण तापले आहे.
उचलबांगडी नव्हे, कार्यकाळ पूर्ण
राऊत यांची उचलबांगडी केलेली नाही, तर त्यांचा अ. भा. अनुसूचित जाति विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळ मार्च २०२१ मध्येच पूर्ण झाला होता. उलट, वेणुगोपाल यांनी जारी केलेल्या पत्रात राऊत यांनी केलेल्या कामाची दखल घेतली आहे, असा दावा राऊत समर्थकांनी केला आहे. दरम्यान, आपण स्वत:च अध्यक्षपदाची जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीकडे द्यावी, अशी विनंती पक्षाकडे केली होती, असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.