नागपूर : डॉ. मोहन काशीकर यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख पदावरून हटवण्याच्या वादग्रस्त आदेशावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे काशीकर यांना दिलासा मिळाला.
या प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी काशीकर यांच्याकडे मानव्य विद्याशाखेच्या पदव्युत्तर पदवी शिक्षण विभागाचा अतिरिक्त प्रभार सोपवला होता. काशीकर यांनी कौटुंबिक कारणांमुळे ती जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे कुलगुरूंनी ५ मे २०२१ रोजी वादग्रस्त आदेश जारी करून काशीकर यांना विभागप्रमुख पदावरून हटवले व त्यांची एक वेतनवाढ रोखली. त्याविरुद्ध काशीकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मानव्य विद्याशाखेच्या पदव्युत्तर पदवी शिक्षण विभागाचे प्रभारीपदाची अतिरिक्त जबाबदारी दिली त्यावेळी हे पदच अस्तित्वात नव्हते. त्यामुळे या पदाची जबाबदारी नाकारल्यामुळे कर्तव्यात कसूर करण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता त्यांना अंतरिम दिलासा दिला. तसेच, वादग्रस्त आदेशावर पुनर्विचार व्हावा यासाठी तीन दिवसात सक्षम प्राधिकाऱ्याकडे अर्ज सादर करण्यास सांगितले आणि सक्षम प्राधिकाऱ्याने अर्ज मिळाल्यानंतर त्यावर तीन आठवड्यात कायद्यानुसार निर्णय घ्यावा असे निर्देश दिले. काशीकर यांच्या वतीने अॅड. फिरदोस मिर्झा यांनी कामकाज पाहिले.