सुमेध वाघमारे, नागपूर :जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे नवे जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) म्हणून कुष्ठरोग विभागाचे सहायक संचालक डॉ. राजकुमार गहलोत यांची वर्णी लागली. त्यांनी गुरुवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.
तत्कालीन ‘डीएचओ’ डॉ. अजय डवले यांची बदली आरोग्य विभागाच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्राचार्यपदी झाल्यानंतर या पदाची जबाबदारी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रेवती साबळे सांभाळत होत्या. मागील काही महिन्यापासून या पदासाठी डॉ. गहलोत यांचे नाव सुरू होते, अखेर त्यांच्या नावाचे पत्र धडकले.
डॉ. गहलोत यांनी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून (जीएमसी) ‘एमबीबीएस’चे शिक्षण घेतले. पदव्युत्तर शिक्षण त्यांनी मुंबई येथील ग्रॅण्ड मेडिकल कॉलेज येथून पूर्ण केले. डॉ. गहलोत मूळचे वधेर्चे. यामुळे पहिली पोस्टिंग वर्धेच्या आर्वी तालुक्यात तालुका अधिकारी म्हणून झाली. त्यानंतर गोंदिया जिल्ह्याचे ‘एडीएचओ’, वर्धा येथे जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी, नंतर पाच वर्षे चंद्रपूर ‘डीएचओ’ म्हणून काम पाहिले. सहा महिन्यांपूर्वीच नागपूर येथे कुष्ठरोग सहायक संचालक म्हणून बदली झाली. आता त्यांच्याकडे ‘डीएचओ’ म्हणून जबाबदारी सोपविण्यात आहे.
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणार -
‘लोकमत’शी बोलताना डॉ. गहलोत म्हणाले, जि.प.च्या आरोग्य विभागाच्या अखत्यारित जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये ५३ प्राथमिक आरोग्य केंद्र (पीएचसी), ३१६वर उपकेंद्र आणि अॅलोपॅथिक व होमिओपॅथिक दवाखाने आहे. या आरोग्य संस्थांवर ग्रामीण आरोग्याची धुरा आहे. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणीला प्राधान्य दिले जाणार आहे.