लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य सेवा क्षेत्रात कार्य करणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वृद्धोपचार तज्ज्ञ डॉ. संजय बजाज यांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. डॉ. बजाज यांना बेल्जियमच्या लीज विद्यापीठात जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने विशेष प्रशस्ती पत्रक प्रदान करण्यात आले तर एप्रिल महिन्यात पोलंडमध्ये होणाऱ्या आॅस्टिओपोरोसिस महाअधिवेशनासाठी विशेषत्वाने आमंत्रित करण्यात आले आहे. आॅस्टिओपोरोसिस आणि सार्कोपेनिया हे आजार ज्येष्ठांसाठी घातक मानले जातात. आॅस्टिओपोरोसिसमधये हाडे पोकळ व छोटी होतात तर सार्कोपेनियामध्ये वयानुसार स्नायुंची क्षीणता वाढत जाते. जागतिक स्तरावर यावर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून ‘सारकोल प्रश्नावली’ तयार करण्यात आली आहे. या प्रश्नावलीच्या माध्यमातून स्नायुंची स्थिती व भविष्यातील धोके जाणून प्रतिबंधात्मक उपचार करणे शक्य होते. डॉ. बजाज यांनी या प्रश्नावलीचे हिंदी व मराठीमध्ये भाषांतर केले आहे जे सार्कोपेनियाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.