नागपूर : विदर्भामधून सर्वाधिक ५२ पेटंट प्राप्त करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. संजय ढोबळे यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अलीकडेच सन्मान करण्यात आला. व्हिजन नेक्स्ट संस्थेच्या वतीने आयोजित बौद्धिक संपदा एकस्व (पेटंट) महोत्सवात डॉ. ढोबळे यांना हा सन्मान मिळाला.
विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील प्रा. ढोबळे यांच्या नावे एकूण ५२ पेटंट आहेत. भौतिकशास्त्र व अन्य विषयांवर विदर्भात तब्बल ५२ पेटंट प्राप्त करीत डॉ. ढोबळे हे अग्रस्थानी आहेत. त्यामुळे डॉ. ढोबळे यांचा विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, आमदार कृष्णा खोपडे, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, माजी महापौर तथा व्हिजन नेक्स्टचे प्रमुख संदीप जोशी यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.