नागपूर : महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे (माफसू) कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर यांचा कार्यकाळ शनिवारी संपला. त्यामुळे अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्याकडे (माफसू) कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
शनिवारी डॉ. गडाख यांनी माफसूचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर यांच्याकडून कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला. डॉ. आशिष पातूरकर यांच्या कार्यकाळात पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचा खऱ्या अर्थाने विस्तार झाला. हे विद्यापीठ लोकांपर्यंत पोहोचले. संशाेधन व कार्यविस्तार यावर डॉ. पातूरकर यांनी विशेष भर दिला. डॉ. पातूरकर यांनी मुंबई येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातून कारकीर्द सुरू केली. येथे ८ वर्षे ते सहयोगी अधिष्ठाता म्हणूनही होते. २२ जानेवारी, २०१८ रोजी त्यांनी माफसूच्या कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारला. शनिवारी त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला. त्यामुळे कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला. शनिवारी त्यांनी कार्यभार स्वीकारला.