लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: डॉ. शीतल अत्यंत बुद्धिमान आणि गुणवंत होती. आनंदवनाबाबत तिची काही स्वप्नं होती. ती पूर्ण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. आनंदवन आणि परिवारासोबत समाज नेहमीच उभा राहिला आहे. या दु:खद घटनेतही समाजाने आमच्यासोबत उभे राहावे, अशी विनंती आमटे परिवाराच्या सूनबाई पल्लवी कौस्तुभ आमटे यांनी केली आहे.
लोकमतचे तालुका प्रतिनिधी प्रवीण खिरटकर यांना संपूर्ण घटनाक्रमावर प्रतिक्रिया देताना त्या अतिशय भावूक झाल्या होत्या.आनंदवनमधील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांच्या निधनानंतर आज प्रथमच आमटे कुटुंबातील प्रतिक्रया समोर आली आहे. आतापर्यंत कुटुंबातील एकही सदस्य समोर आला नव्हता.
डॉ. शीतल यांच्या पश्चात आनंदवनची जबाबदारी कोण सांभाळणार? या प्रश्नाला उत्तर देताना तुर्तास या विषयी काही बोलता येणार नाही. आम्हाला काही वेळ द्या. विचारांची दिशा योग्य पद्धतीने जाण्यासाठी काही वेळ जावा लागेल. काळच या प्रश्नाचे उत्तर देईल, असे त्या म्हणाल्या. जे घडलं ते अत्यंत वाईट आहे. करजगी आणि आमटे दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा पहाड कोसळला आहे. दु:खाच्या भरात ते काही बोललेही असतील तरी ही वेळ यावर चर्चा करण्याची नाही असे सांगत त्यांनी करजगी कुटुंबाच्या पत्रांमधील आरोपांविषयी फारसे काही बोलण्याचे टाळले.