नागपूर : जिल्हाधिकारी आर. विमला यांची महिला व बाल विकास विभाग, पुणे येथे आयुक्तपदी बदली करण्यात आली असून, नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांची नागपूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी त्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले.
डॉ. विपिन इटनकर हे विदर्भातलेच आहेत. ते मूळचे चंद्रपूरचे असून, नागपुरातील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथून त्यांनी एमबीबीएस केले आहे. विद्यानिकेतून येथून बारावीची परीक्षा ८८ टक्क्यांनी उत्तीर्ण केली. २०१० मध्ये त्यांनी एमबीबीएसची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर एका सरकारी रुग्णालयात नोकरीसाठी ते चंडीगडला गेले. तिथेच त्यांनी यूपीएससीची तयारी केली. पहिल्या तीन प्रयत्नांत त्यांना यश आले नाही. चौथ्या प्रयत्नात मात्र त्यांनी यूपीएससीच्या परीक्षेत १४ वा क्रमांक पटकावला. २०१४ च्या बॅचचे ते टॉपर आहेत. सध्या ते नांदेडच्या जिल्हाधिकारीपदावर कार्यरत होते.
आर. विमला या १० जुलै २०२१ रोजी नागपूरच्या जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्या. त्यांच्या कार्यकाळात प्रशासकीय कामाला गती मिळाली. कोविडमुळे विधवा व अनाथ झालेल्या बालकांसाठी केंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या कामाला त्यांनी गती दिली. लक्ष्मी योजनेला गती देण्याचे कार्य त्यांनी केले.