नागपूर : येथील अंबाझरी भागात असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सांस्कृतिक भवन तोडण्याची कारवाई नागपूर महानगरपालिकेने जून महिन्यात केली. हे भवन का आणि कशासाठी तोडले, असा जाहीर सवाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)चे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात (सिदनाक) यांनी गुरुवारी नागपुरात केला.
खरात यांनी गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास अंबाझरी भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असणाऱ्या सांस्कृतिक भवन परिसराला भेट दिली. मात्र तेथील सुरक्षा रक्षकांनी त्यांना आत जाण्यापासून रोखले. परवानगी असेल तरच आज जाऊ देण्याचे आदेश असल्याचे सुरक्षा रक्षकांनी सांगितले. त्यामुळे खरात आणि त्यांच्या सोबतच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावरूनच दर्शन घेतले.
या संदर्भात ‘लोकमत’शी बोलताना खरात म्हणाले, जून महिन्यात कोरोनाची लाट असतानाच हे भवन तोडल्याची माहिती आपणास मिळाली होती. त्यामुळे मुद्दाम पाहणी करण्यासाठीच आपण ही भेट दिली. नागपूर महानगरपालिकेवर भाजपाची सत्ता आहे. देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री असून महाराष्ट्रतील ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे आपण मुद्दाम त्यांनाच जाहीर विचारणा करीत आहोत. हे सांस्कृतिक भवन का पाडले, कोणी आणि कशासाठी पाडले, याचा खुलासा फडणवीस यांनी करावा. ही जागा महानगरपालिकेची आहे. त्यामुळे मनपाने भवन तोडण्याची परवानगी दिलीच कशी, असा प्रश्न उपस्थित करून, त्या जागेवर अन्य कोणतेही बांधकाम होऊ देणार नाही, अशा इशारा त्यांनी पक्षाच्या वतीने दिला. यावेळी त्यांच्यासोबत मुंबईचे अध्यक्ष राजू थाटे, मिलिंद दुपारे, सरिता मेश्राम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.