आरक्षणावरील सीएम शिंदेंचे भाषण 'भाजप आरएसएस'ने दिलेला ड्राफ्ट; नाना पटोलेंचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 01:32 PM2023-12-20T13:32:35+5:302023-12-20T13:33:55+5:30
मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
Maratha Reservation( Marathi News ): नागपूर- मराठा आरक्षणाची चर्चा काल विधानसभेत झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा समाजाला आरक्षण देणारच असं आपल्या भाषणात सांगितले. आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेणार असल्याची घोषणाही शिंदे यांनी केली. यावर आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह भाजपवर आरोप केले.
विधान परिषदेत दानवेंचे आरोप अन् मंत्री लोढांचा राजीनामा; गोऱ्हेंनी केली मध्यस्थी
"राज्यात सध्या ऐरणीवर असलेल्या विविध समाजाच्या आरक्षणावर जातनिहाय जनगणना हाच पर्याय आहे. काँग्रेस पक्षाने त्यासंदर्भातील आपली भूमिका सभागृहात मांडली आहे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जातनिहाय जनगणनेला विरोध आहे. संघ व भारतीय जनता पक्षाला आरक्षणच संपवायचे आहे म्हणून महाराष्ट्रात वाद चिघवळला जात आहे, असा आरोपही पटोले यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत आरक्षणप्रश्नी केलेले भाषण हे भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिलेला ड्राफ्ट होता, अशी टीकाही नाना पटोले यांनी केली.
जातनिहाय जनगणना हाच एकमेव पर्याय
नाना पटोले पुढे म्हणाले की, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक दुर्बल घटकांना आरक्षण देण्यासाठी जातनिहाय जनगणना हाच पर्याय आहे. शिंदे समितीचे काम फक्त कुणबी प्रणाणपत्र आहे का हे पाहण्याचे काम आहे ते कायमस्वरुपी काम नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात म्हणाले की अनेक जाती आरक्षण मागत आहेत, त्यासाठी आंदोलने सुरू आहेत त्या समाज घटकांना आरक्षण द्यायचे आहे. पण या सर्वांवरचा एकच पर्याय आहे तो म्हणजे जातनिहाय जनगणना. भाजपा सरकारने जातनिहाय जनगणना करावी म्हणजे सर्वांना न्याय मिळेल व महाराष्ट्रात समाज-सामाजात लावलेली आगही थांबेल.