लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील ‘ड्रॅगन पॅलेस टेम्पल’ व परिसराचा जागतिक दर्जाचा विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधातील विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली. याअंतर्गत ‘ड्रॅगन पॅलेस टेम्पल’ परिसरातील ४० एकर जागेवर आंतरराष्ट्रीय ‘बुद्धिस्ट थिम पार्क’, पर्यटन सुविधा आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्राची स्थापना होणार आहे. खऱ्या अर्थाने ‘ड्रॅगल पॅलेस टेंपल’ जागतिक पातळीवरील बौद्ध पर्यटन स्थळ म्हणून विकसित होणार आहे.‘ड्रॅगन पॅलेस टेंपल’ची निर्मिती १९९९ साली जपानच्या बौद्ध महाउपासिका नोरिको ओगावा यांच्या पुढाकारातून झाली. हे पॅलेस आंतरराष्ट्रीय शांती, मैत्री आणि मानव कल्याणकारी केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. ‘टेंपल’चे व्यवस्थापन ओगावा सोसायटीद्वारे करण्यात येते. त्यांच्यामार्फत या परिसरात अनेक सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतात. या ‘टेंपल’सह परिसराचा जागतिक दर्जाचा विकास व्हावा यासाठी २१४ कोटींच्या विकास आराखड्याला जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन समितीने २०१५ मध्ये मान्यता दिली होती व शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. येथे आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र स्थापन करण्याच्या दृष्टीने विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मान्यता दिली होती. कामाच्या पहिल्या टप्प्यासाठी ७५ कोटी १७ लाख रुपयांच्या निधीला राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली. सर्वसाधारण योजनेतून हा निधी मंजूर करण्यात येणार आहे. ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा विषय लावून धरला होता.‘एनएमआरडीए’कडे जबाबदारीया प्रस्तावातील सर्व कामे ‘एनएमआरडीए’ म्हणजेच नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण करणार आहे. ‘एनएमआरडीए’ नोडल एजन्सी म्हणून काम पाहणार आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर या वास्तूची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ओगावा सोसायटीची राहणार असून त्यासाठी येणारा आवर्ती खर्च या सोसायटीस करावा लागणार आहे. या प्रकल्पाची मालकी सोसायटीसह राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाची राहणार आहे.यासाठी मिळणार निधी‘ड्रॅगन पॅलेस टेम्पल’ परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे बांधकाम करणे, या परिसराचे सौंदर्यीकरण, संरक्षण भिंत, अॅम्युजमेंट पार्क, वीज जोडण्या, पाणीपुरवठा, विपश्यना ध्यान केंद्राचे बांधकाम, डॉ. आंबेडकर बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्र, ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी वसतिगृह, विविध विकास कामांकरिता निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात निवास तसेच पायाभूत सुविधांच्या कामांवर भर देण्यात येईल. यात बाह्य विद्युतीकरण,‘प्लंबिंग’, ‘सॅनिटेशन’, अग्निप्रतिरोध यंत्रणा, वास्तुविशारद शुल्क आदींचा समावेश आहे.असा असेल ‘बुद्धिस्ट थीम पार्क’‘बुद्धिस्ट थीम पार्क’च्या प्रस्तावात अम्पीथिएटर, संगीत कारंजे, अॅम्युझमेंट पार्क, आर्ट अॅण्ड क्राफ्ट सेंटर, निवास व्यवस्था, पार्किंग, शौचालये, व्हीआयपी निवास व्यवस्था, कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था, विविध देशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी निवास व्यवस्था, शॉपिंग कॉम्लेक्स, गौतम बुद्धांच्या जीवनावरील छायाचित्रांचे प्रदर्शन, ‘बुद्धिस्ट थीम’वर आधारित बगीचा, ‘बुद्धिस्ट कोर्ट’ आदींचा समावेश असेल.
‘ड्रॅगन पॅलेस’चा होणार ‘वर्ल्ड क्लास’ विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 9:56 PM
नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील ‘ड्रॅगन पॅलेस टेम्पल’ व परिसराचा जागतिक दर्जाचा विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधातील विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली.
ठळक मुद्देविकास आराखड्याला मंत्रिमंडळाची मान्यता : ‘बुद्धिस्ट थिम पार्क’ साकारणार