रुग्णहिताकडे दुर्लक्ष : रुग्णांमध्ये भीतीचे वातावरणनागपूर : सोमवारी पेठेतील राज्य कामगार विमा रुग्णालयाच्या आकस्मिक विभागात अजगराची दोन पिले शुक्रवारी सकाळी आढळल्याने खळबळ उडाली होती. परंतु त्याच दिवशी रात्री पुन्हा तिसरे पिलू आढळून आल्याने रुग्णांसह डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे, याला रुग्णालय प्रशासनाने गंभीरतेने घेतले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या रुग्णालयात शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास आकस्मिक विभागातील एका खाटेवर रुग्णांऐवजी दीड ते दोन फुटाची दोन अजगराची पिले वळवळताना दिसताच अनेकांची भंबेरी उडाली होती. दोन्ही पिलांना केले डबाबंद नागपूर : कर्मचाऱ्यांनी सर्पमित्राला बोलावल्यानंतर अत्यंत शिताफीने या दोन्ही पिलांना पकडून डबाबंद केले होते. सुदैवाने खाटांवर रुग्ण नसल्याने मोठी दुर्घटना टळली. सकाळची दहशत सायंकाळपर्यंत कायमच होती. रात्री मात्र रुग्णांना पुन्हा धक्का बसला. रात्री ९.३० वाजताच्या सुमारास अपघात विभागातील एका डॉक्टरच्या टेबलाच्या खाली दीड फुटाचे एक पिल्लू गुंडाळी मारून बसून असल्याचे एका कर्मचाऱ्याला दिसले. त्याने आरडाओरड करताच रुग्णालयातील सर्वांनीच पाहण्यासाठी गर्दी केली. तिसरे पिल्लू आढळून येताच उपस्थितांमध्ये मात्र प्रचंड घबराट पसरली आहे. कर्मचाऱ्याने सर्पमित्राला फोन करून बोलावले. परंतु, सर्पमित्र येईपर्यंत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यानेच या पिलाला पकडून थर्माकोलच्या बॉक्समध्ये बंद केले. त्यानंतर ते पिल्लू सर्पमित्राच्या स्वाधीन केल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)अजगर की सापशुक्रवारी आढळून आलेली अजगराची पिले नसून ते साप असल्याचे अनेकांचे म्हणणे होते. ते अजगरासारखे दिसत असले तरी ते सापाच्या जातीचा असावेत, असे अनेक सर्पमित्रांचे म्हणणे आहे. परंतु ज्यांनी ही पिले पकडली त्यांनी ती अजगराची पिले असल्याचे म्हटले आहे. अनेक पिले असण्याची शक्यतारुग्णालय परिसर हा झाडाझुडपांनी वेढलेला आहे. यातच रुग्णालयातील दारे-खिडक्या मोडकळीस आलेल्या आहेत. यामुळे साप व इतर प्राणी सहज प्रवेश करतात. एकाच दिवशी तीन पिले आढळून आल्याने आंतररुग्ण व बाह्यरुग्णांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. रुग्णालयाच्या परिसरात आणखी पिले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विमा रुग्णालयात पुन्हा निघाला अजगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2016 2:34 AM