लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : शहरातील पंचशील नगरात दाेन वर्षांपूर्वी नालीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. ती नाली अद्यापही पूर्णत्वास गेली नाही. त्यामुळे त्रास हाेत असल्याने तसेच स्थानिक नगरपरिषद प्रशासन लक्ष देत नसल्याने या भागात राहणारे नागरिक वैतागले आहेत.
पंचशील नगरात सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून जाण्याची प्रभावी साेय नाही. त्यामुळे मुसळधार पाऊस बरसल्यास पावसाचे पाणी नागरिकांच्या घरांमध्ये शिरत असल्याने अनेकांचे नुकसान हाेते. त्यामुळे या भागात पावसाळ्यापूर्वी नालीचे बांधकाम पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी अनेकदा नगरपालिका प्रशासनाकडे करण्यात आली; मात्र या मागणीकडे प्रशासनासाेबत स्थानिक लाेकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष दिले नाही, असा आराेपही नागरिकांनी केला आहे.
नाली बांधकामासाठी खाेदकाम करण्यात आले. नालीचे वेळीच बांधकाम न केल्याने खाेदलेल्या नालीचे काठ खचायला सुरुवात झाली आहे. नालीतील माती व मुरुमाची याेग्य विल्हेवाट न लावल्याने त्याचे ढिगारे राेडलगत पडून आहेत. त्यामुळे राेडवर चिखल हाेत असून, ढिगारे अपघातांना निमंत्रण देत आहेत. त्यातच काही घरांसमाेर खड्डेही तयार झाले आहेत. शिवाय, राेडवरून सांडपाणी वाहते.
नाली बांधकामाचा संथ वेग आणि मध्येच बंद पडणारे काम लक्षात घेता, यात काही दडले असल्याची शंकाही काहींनी व्यक्त केली. पावसाळ्यात या अपूर्ण नाली व पावसाच्या पाण्याचा त्रास हाेणार असल्याने तसेच चिखल व डबक्यांमुळे डासांची पैदास वाढून नागरिकांचे आराेग्य धाेक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पालिका प्रशासनाने या नालीचे बांधकाम तातडीने पूर्ण करावे किंवा याला प्रभावी पर्यायी व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी ॲड. शामराव गोडुळे, राजेंद्र लांजेवार, अशोक पाटील, मुन्नाभाई डोहळे, परमानंद मानवटकर, महेंद्र नारनवरे, तुकाराम बासोटिया, आशिष बावणे, दियेवार, केणे यांच्यासह नागरिकांनी केली असून, आंदाेलनाचा इशारा दिला आहे.