नागपूर : सिमेंट रोड होण्यापूर्वी रस्ते गुळगुळीत होतील, दरवर्षी रस्त्यांवर होणारा खर्च थांबेल, पावसाचे पाणी घरात जाणार नाही, वाहने खराब "होणार नाही, खड्ड्यांमुळे कंबर मोडणार नाही, अशा भूलथापा देण्यात आल्या. आणि शहरभर सिमेंटच्या रस्त्याचे 'जाळे पसरणे सुरू केले. पण आता सिमेंट रोडचे परिणाम दिसायला लागले आहे. सिमेंट रोडमुळे उन्हाळ्याच्या तापमानात वाढ झाली आहे, तर पावसाळ्यात वस्त्यांमध्ये घरात पाणी शिरायला लागले आहे. शताब्दीनगर चौक ते मेडिकलच्या मागच्या गेटपर्यंत बनलेल्या सिमेंट रोडवरील वस्त्यांमध्ये पावसाळ्याच्या तक्रारी लोकमतच्या पथकाने जाणून घेतल्या.
सिमेंट रोड बनविण्यापूर्वी रस्त्यावर पडलेल्या पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यात सार्वजनिक बांधकाम विभाग विसरला. त्यामुळे या रस्त्याच्या काही भागात ड्रेनेज सिस्टीम आहे, तर काही भागात पाण्याचा निचरा करण्यासाठी अशी कुठलीही यंत्रणा नाही. त्या वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी रस्त्यावर साचत असल्याच्या तक्रारी लोकांच्या आहेत. जयभिमनगर, जोगीनगर, पार्वतीनगर, न्यू बाबुळखेडा, जुना बाबुळखेडा, पंचशील नाइट हायस्कूल, विश्वकर्मानगर हा वस्त्या रस्त्याच्या दोन्ही भागाला आहेत. काही भागात रस्ता उंच असल्याने पावसाचे पाणी वस्त्यांमध्ये शिरते लोकांच्या घरात शिरत असल्याच्या तक्रारी लोकांनी केल्या.
गडरलाइनला जोडली ड्रेनेज लाइन
हा रस्ता टप्प्याटप्प्याने बनविण्यात आला. सुरुवातीला बनलेल्या रस्त्यावर ड्रेनेजची सोयच केली नाही. नंतर रस्ता बनविणाऱ्याच्या लक्षात आल्यानंतर काही भागात ड्रेनेजची लाइन टाकली. पण ही ड्रेनेज लाइन गडरलाइनला जोडली. खरे तर या भागातील गडरलाइन चोकअप झालेली आहे. रामेश्वरी चौकातून गडरलाइनचे पाणी कित्येक दिवसांपासून वाहत आहे. अशात ड्रेनेज लाइन त्याला जोडल्याने गडरचे घाण पाणीही रस्त्यावर पसरते, घरात शिरते अशा लोकांच्या तक्रारी आहे.
पार्वतीनगर गल्ली क्रमांक १ जवळ खोदला खड्डा
पार्वतीनगर गल्ली क्रमांक १ जवळ रस्त्याला लागून वासुदेव नरड यांचे घर आणि दुकान आहे. पार्वतीनगरातील गल्लीतून वाहून येणारे पाणी त्यांच्या घरासमोर जमते. विशेष म्हणजे रस्त्याच्या फुटपाथपासून त्यांचे घर २ फूट उंच आहे. असे असतानाही त्यांच्या घरात पाणी शिरते. त्यांनी तक्रारी केल्यामुळे घरासमोरच मोठा खड्डे ख ठेवला आहे. यापूर्वीही असाच खड्डा खोदला होता.
फुटपाथवर ड्रेनेजचे चेंबर
सिमेंट रोडवर पडणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी ड्रेनेज लाइन फुटपाथ व रस्त्याला लागून बनविणे गरजेचे आहे. परंतु या रस्त्यावर फुटपाथवर ड्रेनेजचे चेंबर दिसून येतात. त्यामुळे पावसाचे पाणी वस्त्यांमध्ये शिरते.
कामात नियोजनाचा अभाव, भ्रष्टाचारही
कोट्यवधी रुपयांची या भागात रस्त्याची कामे झाली. पण कामात नियोजन दिसून आले नाही. त्यातच भ्रष्टाचारही झाला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मोठ्या प्रमाणात फंड या भागातील विकासकामांवर दिला. पण त्याचे नियोजन झाले नाही. गडरलाइनचे ५० लाखांचे काम मंजूर आहे, पण कामाला सुरुवात झाली नाही, अशी माहिती स्थानिक रहिवासी अजय हिवरकर यांनी दिली.