लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमना परिसरातील आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वर्षभरापासून गटारलाईन चोक झाल्यामुळे गटारीचे पाणी वसतिगृह परिसरात साचले आहे. विद्यार्थ्यांनी आदिवासी विभागापासून एनआयटीपर्यंत तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असल्याने वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयापुढे ठिय्या दिला.राज्यभरातून शिक्षणासाठी नागपुरात आलेले अनुसूचित जमातीचे विद्यार्थी या वसतिगृहात राहतात. सध्या २८६ विद्यार्थी येथे वास्तव्यास आहे. वसतिगृहाची गटारलाईन चोक झाल्यामुळे वसतिगृह परिसरात पसरलेल्या घाणीमुळे विद्यार्थी त्रस्त आहे. घाण पाण्यामुळे वसतिगृहात दुर्गंधी पसरली आहे. डासांचा उद्रेक वाढला आहे.विद्यार्थी आजारी पडायला लागले आहे. पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या सभोवताली गटारीच्या पाण्याची घाण पसरली आहे. गेल्या वर्षभरापासून वसतिगृहात ही समस्या आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी, एनआयटीचे अधीक्षक अभियंता, मनपाचे आरोग्य अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, अप्पर आयुक्त आदिवासी विभाग, यांच्यासह आदिवासी विभागाच्या सचिवांनासुद्धा या समस्येसंदर्भात अवगत केले आहे. पण विद्यार्र्थ्यांच्या आरोग्याचा हा भीषण प्रश्न कुणीही सोडविला नाही. नुकतीच या वसतिगृहाला प्रकल्पस्तरीय नियोजन आढावा समितीच्या सदस्यांनी भेट दिली. वसतिगृहाची दुरवस्था बघून संताप व्यक्त केला.समितीचे सदस्य व आदिवासी विद्यार्थी संघाचे संघटक सचिव शिवकुमार कोकाडे यांच्या नेतृत्वात मंगळवारी विद्यार्थ्यांनी समस्या सोडविण्यासाठी अप्पर आयुक्त आदिवासी विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. ठिय्या आंदोलनात जितेंद्र धानगुणे, विलास उईके, मनोज कोथळे, गणेश इडपाचे, जितेंद्र अडमाची, सुनील भलावी आदी विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
वसतिगृह वाऱ्यावर३.५ कोटी रुपये खर्चून वसतिगृहाचे बांधकाम केले आहे. २०१४ मध्ये वसतिगृह सुरू झाल्यापासूनच छोटेमोठे प्रॉब्लेम सुरू झाले आहे. वसतिगृहात टाकलेली गटारलाईन निकृष्ट दर्जाची आहे. त्यामुळे गटार चोक होऊन घाण पाणी वसतिगृह परिसरात पसरले आहे. वसतिगृहात थांबू शकत नाही, अशी अवस्था आहे. प्रकल्प अधिकारी दिगांबर चव्हाण यांना कित्येक तक्रारी केल्या आहे. वसतिगृहाच्या वॉर्डनने समस्येकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधल्यानंतरही प्रकल्प अधिकारी त्यांच्यावर दबाव आणत आहे. कायापालट समितीलाही या समस्येबद्दल अवगत केले होते. पण कुणाचेच लक्ष नाही, वसतिगृह वाऱ्यावर सोडल्यासारखी अवस्था असल्याची ओरड विद्यार्थ्यांची आहे.