नागपूर - प्रधानमंत्री आवास योजना ही महत्त्वाकांक्षी योजना असून, यामुळे बेघर हा शब्द संपणार आहे. प्रत्येक भारतीयांचे घराचे स्वप्न या योजनेमुळे पूर्णत्वास येणार आहे, असे मत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळांतर्गत विभागात विविध उत्पन्न गटासाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या १५१४ सदनिकांसाठी शनिवारी लक्ष्मीनगर चौकातील सांस्कृतिक सभागृहात आॅनलाईन सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी खा. डॉ. विकास महात्मे, म्हाडा नागपूर मंडळाचे सभापती तारिक कुरेशी, नागपूर मंडळाचे मुख्य अधिकारी संजय भिमनवार उपस्थित होते. या वेळी अहीर म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्रत्येक नागरिकाला त्याच्या हक्काचे घर मिळवून देण्यासाठी ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. भारतीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच देशातील विषमता दूर करण्यासाठी या योजनेचे महत्त्व वादातीत आहे. आगामी काळात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अधिकाधिक घरे बांधण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.नागपूर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळांतर्गत चंद्रपूर, हिंगणघाट व नागपूर येथील विविध उत्पन्न गटातील अर्जदारांकडून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मागील वर्षी जुलै महिन्यात करण्यात आला होता. या योजनेंतर्गत विविध उत्पन्न गटातील १५५३ सदनिकांचे आॅनलाईन पद्धतीने सोडत काढून वाटप करण्यात आले. ही सोडत यू-ट्युबच्या माध्यमातून नागपूर हाऊसिंग अॅण्ड डेव्हलपमेंट बोर्ड २०१८ च्या संकेतस्थळावरदेखील उपलब्ध आहे.नागपूर मंडळाने आतापर्यंत २५ हजार घरे बांधून १६ हजार भूखंड विकसित केले आहते. आगामी काळात नागपूर येथे १२ हजार २०० घरे उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे नागपूर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य अधिकारी संजय भिमनवार यांनी सांगितले.यावेळी गिरीश जोशी, सुनील साधवानी, प्रा. सुमित खत्री, विशाल गायकवाड, श्रीमती सलमा शेख तसेच सुनीलकुमार तिवारी हे पंच उपस्थित होते.
२०२२ पर्यंत प्रत्येकाचे घराचे स्वप्न पूर्ण - हंसराज अहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 5:11 AM