नागपूर: २४ तासांच्या कालावधीत उपराजधानीत दोघांनी गळफास घेत आत्महत्या केली. त्यात एका बारा वर्षांच्या मुलाचादेखील समावेश असून त्याच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित मुलाच्या कुटुंबियांकडून नवीन घर बांधण्यात येत होते व लवकरच स्वत:च्या घरात जाऊन सुखाने राहण्याचे त्यांचे स्वप्न भंगले आहे. मानकापूर व वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या.
कृष्णकुमार श्रीनारायण नायडू (४३, श्रावणनगर) यांचा मुलगा हर्षित (१२) हा शालेय विद्यार्थी होता. शनिवारी दुपारी तो शाळेतून घरी आला. त्यानंतर जेवण करून तो खेळायला गेला. जाताना तो आईला सांगून गेला. रात्री आठ वाजले तरी तो घरी आला नाही त्यामुळे त्याच्या घरच्यांनी शोधाशोध केली. श्रावणनगर परिसरातच नायडू कुटुंबियांच्या नव्या घराचे बांधकाम त्याच परिसरात सुरू आहे. त्याच्या वडिलांनी तेथे जाऊन पाहिले असता एका खोलीत लाकडी बल्लीला हर्षित गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांनी त्याला खाली उतरवून मेडिकल इस्पितळात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या आत्महत्येचे कारण समोर येऊ शकले नाही. त्याच्या आईच्या ओढणीनेच त्याने गळफास घेतला. तो आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता व त्याच्या मृत्यूमुळे त्यांच्यासह परिसरातील लोकांना मोठा हादरा बसला आहे. वाठोडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कृष्णकुमार यांच्या नवीन घराच्या स्लॅबचे काम दोन दिवसांअगोदरच झाले होते. लवकरच घर पूर्ण होईल व पत्नी-मुलासह तेथे रहायला जाऊ हे स्वप्न भंगले आहे.
दुसरी घटना मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ज्ञानेश्वर नारायण कडू (५२, नमिष अपार्टमेंट, मानवतानगर) यांनी शनिवारी दुपारच्या सुमारास घराच्या छताच्या लोखंडी हुकला लुंगीच्या सहाय्याने गळफास घेतला. त्यांच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. त्यांचा मुलगा निखील याच्या सूचनेवरून मानकापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.