नागपूर : ऑस्ट्रेलियाविरुद्ध असलेली टेस्ट मॅच पाहण्यासाठी वयाच्या १३ व्या वर्षी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये मोठ्या प्रयत्नाने पोहोचलेल्या सुशील दोशी यांना तेव्हा काय कल्पना की, ज्या बॉक्समध्ये बसून बॉबी तल्यारखान आणि विजय मर्चेंट क्रिकेट सामन्याचे धावते वर्णन करीत होते, त्याच बॉक्समध्ये बसून त्यांनाही तीच संधी मिळणार म्हणून ! पद्ममश्री पुरस्काराने सम्मानित ७५ वर्षीय सुशील दोशी मागील ५० वर्षांहून अधिक काळापासून हिंदीत कॉमेंट्री करत आहेत.
इंदूर येथील दोशी यांनी बालपणीचा किस्सा सांगत म्हणाले की, वडील १९५९ मध्ये मुंबई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट मॅच दाखविण्यासाठी घेऊन गेले होते. तीन दिवस प्रयत्न करूनही तिकीट मिळाले नव्हते. अखेर एका पोलिसाने त्यांना स्टेडियमध्ये घुसविले. वडील मात्र बाहेरच राहिले. या सामन्यात दोशी यांचे लक्ष कॉमेंट्री बॉक्सकडे गेले. तेव्हा त्यांच्या मनात विचार आला की मलाही येथे बसून कॉमेंट्री करण्याची संधी मिळाली तर... अखेर त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरले. त्यांना १९७२ मध्ये कॉमेंट्री करण्याची संधी मिळाली.
कॉमेंट्रीमध्ये हिंदी भाषेचा स्तर घसरत असल्याची खंत सुशील दोशी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, योग्य शब्दप्रयोगामुळे कॉमेंट्रीमध्ये जिवंतपणा येतो; परंतु त्याकडे सध्या दुर्लक्ष केले जाते. टीव्ही व रेडिओच्या कॉमेंट्रीमध्ये फरक आहे. टीव्हीमध्ये लहान वाक्याचा प्रयोग केला जातो. कारण सामना तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता; परंतु रेडिओतील कॉमेंट्री करताना प्रेक्षकांसमोर प्रसंग उभा करावा लागतो, यामुळे वाक्य लांब वापरले जातात. भारत-इंग्लंडदरम्यान १९७९ मध्ये ओव्हल टेस्टचा किस्साही त्यांनी ऐकविला. सामना रोमांचक झाल्याने धक्का बसण्याच्या भीतीने अनेक ज्येष्ठ सामना सोडून परतू लागले होते. त्यांची स्थिती बघून कॉमेंट्री करताना आपण म्हणालो, ‘कमजोर दिल के लोग इस मुकाबले को न देखें.’ त्यानंतर हे वाक्य अतिशय लोकप्रिय झाले. ऑस्ट्रेलियाचे ऑलराउंडर किथ मिलर यांनी केलेली प्रशंसा जीवनातील सर्वांत मोठी असल्याचे ते म्हणाले.
‘तो’ काळ कॉमेंट्री करणाऱ्यांचा
जसदेव सिंह यांना गुरू मानणारे सुशील दोशी म्हणाले, मुरली मनोहर मंजूल, स्कंध गुप्त, मनीष देव, अनंत सीतलवाड, नरोत्तम पुरी, जे.पी. नारायणन यांच्यासोबत कॉमेंट्री करताना आनंद येत होता. तेव्हा कॉमेंट्रीसाठी केवळ दीडशे रुपये मिळत होते; परंतु मन प्रसन्न होत होते.
ब्रॅडमनला हसविले
भारतीय टीम पर्थमध्ये चारदिवसीय सामना खेळत होती. एका अपिलादरम्यान चंद्रशेखरने दोन बोट दाखविले. गावसकर व बेदी यांच्यासोबत दोशी बसले होते. दोशी त्या प्रसंगावर म्हणाले, चंद्रशेखर म्हणत आहे की, फलंदाजाला दोन वेळा आउट केले. बेदी यावर खूप हसले व ही गोष्ट ब्रॅडमनपर्यंत पोहोचली. ते देखील यावर भरभरून हसले.