नागपूर : जवळपास २४ कोटी रुपये किमतीच्या अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) नागपूरच्या अधिकाऱ्यांनी पश्चिम दिल्लीच्या सुभाषनगर येथून नायजेरियन नागरिकाला अटक करून बुधवारी नागपुरात आणले. त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, नागपूर यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २९ आॅगस्टपर्यंत डीआरआय कोठडी सुनावली.
केनियातल्या नैरोबी येथून शारजा, यूएईमार्गे नागपुरात अॅम्फेटामाइन प्रकारातील २४ कोटी रुपये किमतीचे ३.०७ किलो अमली पदार्थ आणणाऱ्या भारतीय नागरिकाला डीआरआयने रविवारी पहाटे नागपूर विमानतळावर अटक केली होती. त्याला रविवारीच प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, नागपूर यांच्यासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला २५ आॅगस्टपर्यंत डीआरआय कोठडी सुनावली होती. भारतीय नागरिक तस्करीचे अमली पदार्थ दिल्ली येथील नायजेरियन नागरिकाला देणार होता.
विदेशातून एवढ्या मोठ्या किमतीचे अमली पदार्थ नागपुरात आणण्याची पहिलीच वेळ आहे. या तस्करीत आंतरराष्ट्रीय तस्कर सहभागी असून अधिकारी या दृष्टीने तपास करीत आहेत. अटकेतील दोघांची अधिकारी कसून चौकशी करीत आहेत. नागपूर हे छोटे विमानतळ असल्यामुळे भारतीय नागरिकाने अमली पदार्थाच्या तस्करीसाठी या विमानतळाची निवड केल्याचे सूत्रांनी सांगितले. याआधी सोने पेस्ट स्वरुपात नागपूर विमानतळावर जप्त केल्याच्या घटना घडल्या आहेत. भारतीय नागरिक २४ कोटींच्या ३ किलो अॅम्फेटामाइन या अमली पदार्थासह नैरोबी आणि शारजाह या दोन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अधिकाऱ्यांच्या नजरेतून कसा सुटला, हे एक कोडंच आहे. या गंभीर प्रकरणामुळे विमानतळावरील अधिकाऱ्यांची जबाबदारी आणखी वाढली आहे.