नागपूर : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी परराज्यातून गांजा तस्करी करणाऱ्या तस्करांवर शनिवारी बोरखेडी येथे कारवाई करून सुमारे तांदळाच्या पोत्यांमध्ये लपविलेला दीड कोटी रुपये किमतीचा ७६० किलो गांजा जप्त केला.
गांजाची तस्करी फिल्मी स्टाईलने करण्यात येत आहे. तस्कर कोणत्या वाहनांनी, मार्गाने आणि कशा पद्धतीने गांजा आणेल, याची माहिती मिळविणे कठीणच असते. गुप्त माहितीच्या आधारे डीआरआय विभागाचे अधिकारी तस्करांवर कारवाई करीत आहेत. काही लोक आंध्र प्रदेशातून पंजाबच्या ट्रकने गांजा घेऊन येत असल्याची गुप्त माहिती विभागाला मिळाली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी योजना तयार करून जाळे विणले. बोरखेडी येथे एका ट्रकला थांबविण्यात आले. ट्रकमध्ये तांदळाची पोती होती. सखोल चौकशी केल्यानंतरही अधिकाऱ्यांना गांजा आढळून आला नाही. त्यानंतर पोते उघडण्यात आले. तांदळाच्या २५ पोत्यांमध्ये पाच-पाच किलोचे पॅकेट तयार करून गांजा ठेवण्यात आला होता. तांदळाचे सर्व पोते उघडण्यात आले. त्यातून ७६० किलो गांजा जप्त करण्यात अधिकाऱ्यांना यश मिळाले.
या प्रकरणी दोन आरोपी पवन शर्मा आणि प्रवेश मंडल यांना अटक केली. ही कारवाई डीआरआयच्या पाच ते सहा अधिकाऱ्यांनी केली.