भिवापूर (नागपूर) : भिवापूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात बुधवारी सायंकाळी ओल्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या ओल्या पार्टीमुळे शासकीय कार्यालय दारूचा अड्डा बनले की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दुय्यम निबंधक कार्यालयात सकाळपासूनच विविध मालमत्तेच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारासंदर्भात सामान्य नागरिकांची रेलचेल होती. सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास ओल्या पार्टीला सुरुवात झाली. ताशपत्ते, विदेशी दारूच्या बॉटल आणि सोबतीला चिवडा असा कार्यक्रम सुरू झाला. हे सर्व लाइव्ह व्हिडीओवजा चित्र लोकमतने आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.
ओल्या पार्टीत कार्यालयाचे मुख्य अधिकारी, सहकारी आणि नगरपंचायतीच्या माजी उपाध्यक्षाचा पतीसुध्दा या मैफिलीत पॅग रिचवितानाचे दृष्य कैद आहे. यासंदर्भात माहिती मिळताच तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, ठाणेदार महेश भोरटेकर तिथे दाखल झाले. त्यांच्यामागोमाग शिवसेनेचे तालुका प्रमुख संदीप निंबार्ते, भाजपचे शहराध्यक्ष विवेक ठाकरे, अविनाश चिमुरकर, हिमांशु अग्रवाल, विजय हेडाऊसह शंभरावर नागरिकही कार्यालयात पोहोचले. रात्री उशिरा याप्रकरणी कारवाई सुरू होती. यासंदर्भात तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी सदर विभागाच्या वरिष्ठांना फोन वरून माहिती देत तत्काळ योग्य कार्यवाही करण्यास सांगितले.
- कार्यालय हलविणार?
दुय्यम निबंधक कार्यालयाला स्वत:च्या मालकीची इमारत नसल्यामुळे मागील काही वर्षांपासून तहसील कार्यालयाच्या इमारतीत हे कार्यालय सुरू आहे. नुकतीच या कार्यालयाला आता स्वत:ची नवनिर्मित इमारत मिळाली आहे. मात्र तरीसुध्दा हे कार्यालय अद्यापही तहसील कार्यालयातच सुरू आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर तहसीलदार कांबळे यांनी लागलीच सदर विभागाच्या वरिष्ठांना माहिती देत तत्काळ कार्यालय हलविण्याच्या सूचना दिल्या.
- भाजपची पोलिसात तक्रार
यासंदर्भात भाजपचे शहर अध्यक्ष विवेक ठाकरे यांनी रात्री उशिरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवित शासकीय कार्यालयात ओली पार्टी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व माजी पदाधिकाऱ्याच्या पतीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.