लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबईच्या धर्तीवर नागपूर शहरातसुद्धा ड्राईव्ह इन व्हॅक्सीन सेंटर सुरू करण्याची तयारी सुरू आहे. याला मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी अनुमती दिली असून, फक्त ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सुविधा राहणार आहे.
यासंदर्भात आदेश जारी करण्यात आला आहे. मोठ्या इमारती व मॉल्सची पार्किंग या ठिकाणी ही सुविधा राहील. उदाहरण म्हणून रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृह, सेंट्रल माॅल, ट्रिलियन मॉल, एम्प्रेस माॅल आदी ठिकाणी ड्राईव्ह इन व्हॅक्सीनची सुरुवात होऊ शकते. या ठिकाणी पुरेशी जागा उपलब्ध आहे. एका बाजूने प्रवेश व दुसऱ्या बाजूने बाहेर जाण्याची व्यवस्था असली पाहिजे. याशिवाय पार्किंग, मैदान व स्टेडियम या ठिकाणी अशी सुविधा निर्माण करता येईल. लसीकरण केंद्रावर वैद्यकीय कर्मचारी, अॅम्बुलन्स, मोबाइल टॉयलेट, पाणी व अन्य आवश्यक सुविधांसाठी झोनचे सहायक आयुक्त, वैद्यकीय अधिकारी, कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जबाबदारी सोपविली जाईल. लाभार्थींना अपॉईंटमेंट घ्यावी लागेल. दोन दिवसात याबाबतचा अहवाल देण्याचे निर्देश सहायक आयुक्तांना दिले आहेत.