निशांत वानखेडे।
नागपूर : वायू आणि जल प्रदूषणानंतर ध्वनिप्रदूषण हे तिसऱ्या क्रमांकाचे अतिहानिकारक प्रदूषण आहे आणि गेल्या काही वर्षात ते ‘सायलेंट किलर’ ठरत आहे. ध्वनिप्रदूषणामुळे भारतात दरवर्षी जवळपास ३ लक्ष लोकांची ऐकण्याची क्षमता घटते तर काही बहिरेपणाचे बळी ठरतात. यामध्ये सर्वाधिक कारणीभूत ठरत आहे तो वाहनांचा गोंगाट. यामध्येही वाहनामधील भोंग्या(हॉर्न)च्या गोंगाटाने ६ ते ८ डेसिबल प्रदूषणाची वाढ केली आहे. मात्र ध्वनिप्रदूषणाच्या भयंकर परिणामांबाबत जागृती नसल्याने हा गोंगाट जीवघेणा ठरू शकतो, याची जाणीव लोकांना नाही.
नागपूर शहरात वाहतूक जनजागृतीसाठी काम करणाऱ्या जनआक्रोश संघटनेचे ज्येष्ठ सदस्य आणि महानिर्मितीचे निवृत्त कार्यकारी संचालक श्याम भालेराव यांनी लोकमतशी बोलताना सांगितले, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानकानुसार निवासी क्षेत्रात दिवसा ५५ डीबी व रात्री ४५ डीबी इतकी ध्वनीची मर्यादा हवी पण ती आम्ही केव्हाच पार केली आहे. वाहनांना चित्रविचित्र, कर्णकर्कश व प्रेशर हॉर्न लावले जातात. काही महाभाग वाहनांशी छेडछाड करून हॉर्नचा आवाज वाढवितात आणि रस्त्यावर तो गोंगाट करीत फिरत असतात. चौकात सिग्नल हिरवा होण्याआधीच मागचे वाहनचालक हॉर्नचा गोंगाट करतात, जणू ते वाजविले की रस्ता साफ होईल. वस्तीजवळ, चौकात, वळणावर गाडीचा वेग कमी करण्याऐवजी हॉर्नचा कर्णकर्कश आवाज करून लोकांच्या कानठळ्या बसवतात.
ध्वनिप्रदूषणामुळे कानातील पेशींना इजा होऊन बहिरेपणा येऊ शकतो. याशिवाय चिडचिडेपणा, कामाची कार्यक्षमता कमी होणे, स्मरणशक्ती कमी होणे, रक्तदाब, हृदयविकार व निद्रानाश यांसारख्या समस्या वाढल्या आहेत. मुलांवर दुष्परिणाम होत आहेत व अपघातही वाढले आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रेशर हॉर्न, पॉवर हॉर्न व म्युझिकल हॉर्नवर बंदी घातली असूनही त्याचा सर्रासपणे वापर होतो. हा बेजबाबदारपणा धोकादायक ठरत असल्याचे मत भालेराव यांनी व्यक्त केले.
प्रदूषणाची मर्यादा ओलांडली
नीरीने शहरात विविध स्थळी ७०० ठिकाणी सर्वेक्षण केले व त्यापैकी ९० टक्के भागात ध्वनिप्रदूषणाची स्थिती मर्यादेच्या पार गेलेली आहे.
स्थळ किती सॅम्पल किमान मर्यादा सर्वाधिक सरासरी ट्रॅफिक नॉईस इन्डेक्स (टीएनआय)
राष्ट्रीय महामार्ग १३७ ६१.२ ९७.६ ९० ९९.३
राज्य महामार्ग ६८ ६०.९ ९६ ८९.४ ९७.२
रिंग रोड १०० ६१.४ ९१.४ ९१.४ ९८.४
मेजर रोड १८८ ६१ ९७.६ ९० १०१.६
मायनर रोड ८८ ५९.५ ९६.७ ९०.७ १००.९
इंडस्ट्रीज ५४ ६० ९४.३ ८१.२ ९९.४
कमर्शिअल २४ ६३.१ ९९.४ ९२.९ ९६.५
निवासी ४१ ५८.७ ९५.४ ८४.१ ९८.२
= (सर्व व्हॅल्यू डेसिबलमध्ये)
जनआक्राेश सातत्याने वाहतूक जनजागृतीसाठी काम करीत आहे व ध्वनिप्रदूषण हा त्यातील महत्त्वाचा मुद्दा आहे. दर महिन्याच्या ३ तारखेला आम्ही नाे हाॅर्न डे म्हणून पाळण्याचे आवाहन करताे. आज या दिनानिमित्त सायंकाळी ५.१५ वाजता आभासी कार्यक्रमाचे आयाेजन केले आहे. यामध्ये तज्ज्ञ मान्यवर मार्गदर्शन करतील.
- रवींद्र कासखेडीकर, जनआक्राेश
न्यायालयाच्या निर्देशानुसार व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने नीरी गेल्या दाेन वर्षांपासून नागपूर व मुंबई येथे ध्वनिप्रदूषणाचे माॅनिटरिंग करीत आहे व त्यात धक्कादायक स्थिती समाेर येत आहे. महाराष्ट्रातील २७ शहरांसाठी नीरीने नाॅईस मॅपिंग सिस्टिम तयार केली आहे व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची मान्यता मिळाली आहे. येत्या काही काळात शहरातील ध्वनीप्रदूषणाची पूर्ण माहिती आम्ही सादर करू.
- डाॅ. रितेश विजय, प्रिन्सिपल सायंटिस्ट, नीरी