दयाल भोवतेभंडारा : सध्या लग्न सराईची धूम सुरू आहे. आयुष्यात लग्न एकदाच होत असल्याने प्रत्येकजण ते वेगवेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करण्याच्या प्रयत्नात असतात. असेच आठवणीतील सेलिब्रेशन लाखांदूर तालुक्यातील एका वधूने आपल्या लग्नात केले. चक्क सजवलेल्या छकड्यावर बसून बँडच्या तालावर नाचत आणि वाजत जागत तिने लग्नमंडपात प्रवेश केला. हा व्हिडिओ सध्या जिल्ह्यात सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
लाखांदूर तालुक्यातील चिचोली येथील चंद्रमणी मेश्राम यांची कन्या गौतमी हिचा विवाह नागपूर जिल्ह्यातील भरतवाडा रेल्वे येथील हंसराज बागडे यांचे चिरंजीव आशिष यांच्याशी बुधवारी १७ मे रोजी दुपारी चिचोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात झाला. एरवि, विवाहस्थळी वधूला तिचे नातेवाईक पारंपारिक पद्धतीने लग्न मंडपात घेऊन येतात. मात्र या लग्न सोहळ्यात वधू गौतमी हिने छकड्यावर बसून लग्न मंडपात प्रवेश केला. यासाठी फुलांनी आणि रंगीबेरंगी फुग्यांनी छकडा सजविण्यात आला होता. बैलजोडीलाही आंघोळ घालून फुले आणि मण्यांच्या माळांनी सजविण्यात आले होते. वधुचा साजश्रृंगार करून गौतमी गॉगल घालून छकड्यावर स्वार होऊन बँँडच्या तालावर आनंदाने नाचत होती. अनेकांनी हा नवलाईचा क्षण मोबाईलमध्ये कैद केला.