कोराडी : महापारेषणच्या वतीने उच्च दाब वीजवाहिन्यांवर (हाय टेन्शन) ड्रोनद्वारे देखरेखीचे प्रात्यक्षिक शनिवारी कोराडी येथे करण्यात आले. वीज वसाहतीतील हनुमान मंदिरासमोरील मैदानावर झालेल्या प्रात्यक्षिकात उच्च दाब वीजवाहिन्यांवर ड्रोनद्वारे देखरेख ठेवून वेळ व श्रमशक्तीची कशी बचत केली जाऊ शकते, याचे प्रात्यक्षिक ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या समक्ष दाखविण्यात आले.
महापारेषण अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर दोन वर्षांपासून करीत आहे. मात्र ही प्रणाली कशी काम करते, तिचा किती उपयोग होऊ शकतो याची माहिती राऊत यांनी जाणून घेतली. अलीकडच्या काळात अतिवृष्टीमुळे वीजवाहिन्या प्रभावित होऊन वीजपुरवठा खंडित होण्याच्या काही घटना घडल्या आहेत. अशा वेळी उच्चदाब वीजवाहिन्यांची दुरुस्ती व देखभाल वेळेवर व्हावी, या दृष्टिकोनातून ड्रोनद्वारे निगराणी व देखरेख अधिक उपयोगी ठरणार आहे.
ड्रोनद्वारे निरीक्षण केले असता लाईनमध्ये असलेले दोष तत्काळ लक्षात येतात. त्याची दुरुस्ती करणे शक्य होते, अशा प्रकारची माहिती यावेळी देण्यात आली. एक ड्रोन कॅमेरा साधारणता: पंधरा किलोमीटरच्या परिसरावर देखरेख ठेवू शकतो. ५५ मिनिटे हे निरीक्षण होईल, अशी बॅटरीची व्यवस्था त्यात करण्यात आलेली आहे. याप्रसंगी महापारेषणचे मुख्य अभियंता वाळके, महानिर्मितीचे मुख्य अभियंता प्रकाश खंडारे, राजकुमार तासकर, खापरखेडा केंद्राचे मुख्य अभियंता राजू घुगे, जिल्हा परिषदेचे सदस्य नाना कंभाले, नगरसेवक मंगेश देशमुख, रत्नदीप रंगारी, वासुदेव बेलेकर, अविनाश भोयर, आदी उपस्थित होते.