आॅनलाईन लोकमतनागपूर : थर्डी फर्स्ट म्हटले की अनेकांचे ओल्या पार्टीचे नियोजन असते. बीअर, दारू घ्यायची, मनसोक्त झिंगायचे, नवेवर्ष सेलिब्रेट करायचे असा बेत असतो. मात्र, या सर्व बाबींना बाजूला सारत रमेश चोपडे मित्र परिवारातर्फे मसाला दूध वितरित करून अनोख्या पद्धतीने मावळत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत करण्यात आले.अवस्थीनगर चौकातील न्यू चोपडे लॉन्स समोर शंभर लिटर मसाला दूध तयार करण्यात आले व ते नागरिकांना वितरित करण्यात आले. वर्षाच्या अखेरी प्रत्येक जण काहीना काही संकल्प घेतात. जीवन अधिक आनंददायी करण्याचा निर्धार करतात. या मंडळींनी हीच संकल्पना उचलून धरली. संकल्प करायचाच असेल तर चुकीच्या गोष्टींचा त्याग करण्याचा करायचा. दारू पिऊन युवकांचे अपघात होतात. अनेकांची कुटुंब विभक्त होतात. कौटुंबिक कलह निर्माण होतो. आरोग्याचे प्रश्न उद्भवतात. त्यामुळे या थर्टीफर्स्टला ‘दारू सोडा अन् दूध प्या’, नवे वर्षे आरोग्य संपन्न जगा, असा संदेश या वेळी देण्यात आला.