लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (बेला) : चालकाचा वेगात असलेल्या कारवरील ताबा सुटला आणि ती कार वळणावर थेट धरणात शिरली. त्यात कारमधील प्राध्यापकासह तरुणाचा बुडून मृत्यू झाला तर अन्य तिघे किरकोळ जखमी झाले. ही घटना बेला (ता. उमरेड) शिवारातील वडगाव (रामा डॅम) धरणात शुक्रवारी (दि. ९) रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.प्रा. आंचल रमाकांत पांडे (४०) व सुशील मोहन अड्याळकर (३५) दोघेही रा. वर्धा अशी मृतांची तर जितेंद्र चलानी (४०), संतोष सोनक्षेत्र (३७) व अमोल पालेवार (४५) तिघेही रा. सिंदी (रेल्वे), जिल्हा वर्धा अशी जखमींची नावे आहेत. प्रा. आंचल पांडे आणि सुशील अड्याळकर एमएच-३२/एएच-२७६८ क्रमांकाच्या कारने शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वर्ध्यावरून निघाले. ते सुरुवातीला सिंदी (रेल्वे) येथे गेले. जितेंद्र, संतोष व अमोल या तिघांना घेऊन ते सायंकाळी बेला मार्गे वडगाव धरण परिसरात गेले.तिथे काही वेळ मौजमस्ती केल्यानंतर ते जवळ असलेल्या शनिमंदिरात दर्शनासाठी गेले. तिथून परत येत असताना रोडच्या वळणावर चालकाचा ताबा सुटला आणि कार थेट धरणात शिरली. त्यात प्रा. आंचल पांडे व सुशील अड्याळकर या दोघांचा बुडून मृत्यू झाला. उर्वरित तिघे जखमी झाले असून, ते कसेतरी पाण्याबाहेर निघाले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तर जखमींना उपचारासाठी नजीकच्या शासकीय रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी बेला पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे.काचा फोडून निघाले बाहेरप्रा. आंचल पांडे हे वर्धा शहरातील जी. एस. कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड इकॉनॉमिक्स येथे प्राध्यापकपदी नोकरी करायचे तर सुशीलचे वडील वर्धा शहरात वैद्यकीय व्यवसाय करतात. कार पाण्यात शिरताच जितेंद्र, संतोष व अमोल हे काचा फोडून बाहेर पडले. त्यानंतर तिघांनी बेला गाठले आणि सुधाकर भोंडगे यांना माहिती दिली. सुशीलला स्टेंअरिंग व्हीलमुळे तर प्रा. पांडे यांना त्यांच्या बाजूला कार झुकल्याने बाहेर पडणे शक्य झाले नाही.
प्राध्यापकासह तरुणाला जलसमाधी : भरधाव कार वडगाव धरणात शिरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 7:15 PM
Car Accident,Drowning Professor चालकाचा वेगात असलेल्या कारवरील ताबा सुटला आणि ती कार वळणावर थेट धरणात शिरली. त्यात कारमधील प्राध्यापकासह तरुणाचा बुडून मृत्यू झाला तर अन्य तिघे किरकोळ जखमी झाले. ही घटना बेला (ता. उमरेड) शिवारातील वडगाव (रामा डॅम) धरणात शुक्रवारी (दि. ९) रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.
ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील बेला शिवारातील घटना