लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रतिबंधित अमली पदार्थांमुळे देशाचे भविष्य धोक्यात आले आहे असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवले. तसेच, अशा अमली पदार्थांची तस्करी व विक्री करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध कठोर भूमिका घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त के ले.मेफॅड्रॉन हा प्रतिबंधित अंमली पदार्थ विकणाऱ्या इम्रान इलयास डल्ला या आरोपीने नियमित जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी वरीलप्रमाणे विचार मांडून त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. अमली पदार्थ विक्री हा समाजाविरुद्धचा गुन्हा आहे. गुन्हेगार आर्थिक लाभाकरिता मेफॅड्रॉनसारखे प्रतिबंधित अमली पदार्थ विकून देशाच्या युवा पिढीला नष्ट करीत आहे. हा अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्यामुळे आरोपीला जामिनावर सोडण्याचे काहीच कारण दिसून येत नाही असे न्यायालयाने पुढे नमूद केले.गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी डल्लाला ५५ ग्रॅम मेफॅड्रॉनसह अटक केली होती. त्याच्याविरुद्ध गुंगीकारक औषधी द्र्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल झालेले नाही, ही बाबदेखील न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळताना विचारात घेतली. न्यायालय समाजाच्या हिताकडे दुर्लक्ष करू शकत नाही असेही निर्णयात स्पष्ट करण्यात आले. सरकारतर्फे अॅड. नितीन रोडे यांनी कामकाज पाहिले.
अमली पदार्थांमुळे देशाचे भविष्य धोक्यात : हायकोर्टाचे निरीक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 10:23 PM
प्रतिबंधित अमली पदार्थांमुळे देशाचे भविष्य धोक्यात आले आहे असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवले.
ठळक मुद्देगुन्हेगारांविरुद्ध कठोर भूमिका आवश्यक