जगदीश जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘ड्रग फ्री सिटी’चे स्वप्न पाहणाऱ्या पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या प्रयत्नांना त्यांचे शिपाईच काळे फासत आहे. पोलिसांच्या संगनमताने शहरात हुक्का पार्लर आणि मादक पदार्थांचा धंदा वाढत आहे. या धंद्यांना संरक्षण देण्यासाठी पोलीस ठाण्यांमध्ये ‘पॅकेज सिस्टीम’ सुरू आहे. याअंतर्गत प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम अदा करून हुक्का पार्लर आणि दुसरे अवैध धंदे चालवणारे संचालक बिनधास्त होऊन आपला व्यवसाय चालवू शकतात. लोकमतच्या हाती लागलेल्या एका आॅडिओ क्लिपिंगमुळे ही बाब उघडकीस आली आहे.सूत्रानुसार शहरात ५० पेक्षा अधिक ठिकाणी हुक्का पार्लर सुरू आहेत. येथे अल्पवयीन मुलामुलींनाही प्रवेश दिला जात आहे. काही ठिकाणी हुक्का पार्लरच्या नवावर मादक पदार्थ किंवा दारू उपलब्ध केली जात आहे. हुक्का पार्लर संचालकांचे पोलिसांशी मजबूत संबंध आहेत. हुक्का पार्लर संचालक आपला व्यवसाय सुरू करण्यापूर्वीच संबंधित पोलीस ठाण्याला विश्वासात घेतले जाते. हुक्का पार्लरच्या एकूण व्यवसायाप्रमाणे मासिक हप्ता अगोदर निश्चित केला जातो.दारू किंवा मादक पदार्थ उपलब्ध करणाऱ्यांचा मासिक हप्ता इतर हुक्का पार्लरच्या तुलनेच जास्त असतो. हप्ता निश्चित झाल्यानंतर हुक्का पार्लरच्या विरुद्ध कुठलीही कारवाई केली जात नाही. जर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दबाव आलाच तर एखादी चालानची कारवाई केली जाते. ही कारवाई हुक्का पार्लरच्या संचालकांसाठी फारशी महत्त्वाची नसते. काही दिवसांपूर्वीपर्यंत शहरातील बहुतांश हुक्का पार्लर हे झोन दोन अंतर्गत येणाऱ्या पश्चिम नागपुरातच सुरू होते. परंतु तरुणांमध्ये वाढते आकर्षण आणि कमाईमुळे आता ते शहरातील वेगवेगळ्या भागातही सुरू झाले आहेत. तरुणवर्ग मुख्यत: महाविद्यालयीन तरुणाई हुक्का पार्लरसाठी वेडी आहे. कुठल्याही हुक्का पार्लरमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. सुरुवातीला केवळ हुक्का पिण्यासाठी येणारे तरुण काही दिवसानंतर गर्द किंवा दुसरे मादक पदार्थाचेही व्यसन करू लागतात. मागील काही वर्षांत शहरात गर्दचे व्यसन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मादक पदार्थाच्या बाजारात त्याला ‘व्हाईट’ नावाने ओळखले जाते. दर आठवड्याला लाखो रुपयांची गर्द नागपूरला पोहोचते. हुक्का पार्लरशिवाय रेस्टॉरंट आणि लॉन संचालकही गर्दचे खरेदीदार आहेत.शहरात असे अनेक रेस्टॉरंट व लॉन संचालक आहेत, ज्यांनी हुक्का पार्लर सुरू केले आहे. ते हुक्का पार्लरसह जुगार अड्डेही चालवीत आहेत. पोलीस आयुक्त कार्यालयापासून काही अंतरावरच असे अड्डे सुरू आहेत. येथे रोज लाखो रुपयांची हार-जित (उलाढाल) होत असते. हा जुगार अड्डा एका चर्चित लॉनमध्ये ‘ठाकूर बंधू’ म्हणून संचालित करतात. येथील ग्राहकांमध्ये उच्चभ्रू आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न परिवारातील तरुण सहभागी आहेत. आठ महिन्यांपूर्वी गुन्हे शाखेने सदरमध्ये डॉलीच्या टपरीजवळ सुरू असलेल्या गर्द तस्कराच्या एका टोळीला पकडले होते. या टोळीच्या सदस्यांसह एक डझन तरुणांनाही पकडण्यात आले होते. त्यात व्यापारी परिवारातील तरुणांना याच जुगार अड्ड्यावर येऊन जुगार आणि गर्दचे व्यसन लागले होते. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून मुख्य गुन्हेगारांना तुरुंगातही पाठवले. गर्द तस्करीची अनेक प्रकरणे यापूर्वीही उघडकीस आली आहेत. परंतु बहुतांश प्रकरणात पोलिसांनी कसून चौकशी करण्याऐवजी ते दाबून स्वत:ची संपत्ती बनवली.विमानाने गर्दची तस्करी करणारी आंतरराज्यीय टोळीसुद्धा पोलिसांच्या हाती लागली होती. परंतु तो २४ तासही पोलिसांच्या ताब्यात राहू शकला नाही. पोलिसांनी जानेवारी महिन्यात मंदसौर, मध्य प्रदेश येथील रहिवासी गावेर्धनसिंह ठाकूर नावाच्या गर्द तस्कराला अटक केली होती. त्याच्याजवळून ५ लाख १३ हजार रुपये किमतीची ५१३ ग्रॅम गर्द जप्त केली होती. तेव्हापासून गर्दची कुठलीही मोठी तस्करी पकडल्या गेलेली नाही.पोलिसांच्या हप्त्याची क्लिपिंग‘लोकमत’जवळ पोलीस कर्मचारी आणि हुक्का पार्लर संचालक यांच्यात झालेल्या बोलणीची क्लिपिंग आहे. यात पोलीस कर्मचारी ठाण्यातील प्रत्येक डीबी पार्टीला चार-चार हजार रुपये मासिक हप्ता मिळत असल्याचे सांगत आहे. पोलीस कर्मचारी हप्ता मिळण्यास उशीर होण्याबाबतचे कारण विचारत आहे. याबाबत काही शंका असल्यास दुसºया हुक्का पार्लरकडे विचारपूस करून माहिती घेण्याचा सल्लाही देत आहे. ही क्लिपिंग ऐकल्यावर हुक्का पार्लर आणि अवैध धंदे करणाऱ्यांसह पोलिसांचे संगनमत असल्याचे स्पष्ट होते. ही आॅडिओ क्लिपिंग ‘व्हायरल’ झाल्याच्या शंकेमुळे घाबरलेल्या गुन्हे शाखेने सोमवारी पाच हुक्का पार्लरवर धाड टाकली होती. या धाडीत सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाद्वारे संचालित हुक्का पार्लरमध्ये दोन विद्यार्थिनींसह नऊ अल्पवयीन मुलेही सापडली होती.
‘ ड्रग फ्री सिटी’ ला नागपूर पोलीसच फासताहेत काळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 9:57 AM
‘ड्रग फ्री सिटी’चे स्वप्न पाहणाऱ्या पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या प्रयत्नांना त्यांचे शिपाईच काळे फासत आहे. पोलिसांच्या संगनमताने शहरात हुक्का पार्लर आणि मादक पदार्थांचा धंदा वाढत आहे.
ठळक मुद्दे‘हुक्का पार्लर’साठी हप्तेबाजीरेस्टॉरंट-लॉनमध्येही मादक पदार्थ, जुगार अड्डा