लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भूखंड विवादात फळ व्यापारी तंवरलाल छाबरानी यांना मदत करणाऱ्या मोबाइल शॉपीचालकाला ड्रग्ज केसमध्ये फसवणाऱ्या कुख्यात गौरवसिंह बग्गा वास्तविकता लपवत पोलिसांना भ्रमित करत आहे. त्याने अनेकांना फसविण्यासाठी बोगस प्रकरणांची तक्रार करणे व भूखंडांवर ताबा मिळविण्याचे प्रयत्न केले आहेत. पोलिसांच्या सक्तीने बग्गाच्या अशा कारनाम्यांचा खुलासा होऊ शकतो.
बग्गा याचा तंवरलाल छाबरानी यांच्यासोबत भूखंडासंदर्भात वादविवाद सुरू होता. यासंदर्भात बग्गा आणि त्यांच्या साथीदारांविरोधात वाठोडा पोलीस ठाण्यात तक्रारीची नोंदही आहे. या वादात नरेश ठुठेजा छाबरानी यांची मदत करत होता. त्यांना धडा शिकविण्यासाठी बग्गाने आपल्या साथीदारांच्या मदतीने ५ सप्टेंबर २०२० रोजी नरेशच्या मोबाइल शॉपीमध्ये ड्रग्ज ठेवून पोलिसांना सूचना दिली होती. परंतु, दुकानातील सीसीटीव्हीमध्ये ड्रग्ज ठेवणारा बग्गाचा साथीदार उघडकीस आला. त्यानंतर लकडगंज ठाण्यात बग्गा व त्याच्या साथीदारांविरोधात मादक पदार्थविरोधक कायद्याअंतर्गत प्रकरणाची नोंद करण्यात आली होती. तेव्हापासून बग्गा फरार होता. त्याच्या हॉटेलमध्ये चौकशी केली असता नातेवाइकांनी गोंधळ माजवत पोलिसांवर मारझोडीचा आरोप लावला होता. गेल्याच आठवड्यात ऑपरेशन क्रॅक डाऊन अंतर्गत पोलिसांनी बग्गाशी संबंधित सात-आठ स्थळांवर धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर तो नातेवाइकांच्या मदतीने नांदेडमध्ये लपून बसला होता. पोलिसांनी अत्यंत संयम घेत २८ मेच्या रात्री बग्गाला सापळ्यात अडकवले आणि त्याला अटक केली. बग्गा आता ३ जूनपर्यंत पोलिसांच्या ताब्यात आहे. ड्रग्ज ठेवणे आणि भूखंड हडपण्याच्या प्रकरणात त्याची चौकशी सुरू आहे. सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार बग्गाचे संबंध ड्रग्ज व भूखंड माफियांसह अनेक गुन्हेगारांशी आहेत. त्याने अनेक ठिकाणची जमीन बळकावली आहे. विवादित जमीन खरेदी करणे आणि वाद निर्माण करून हप्तावसुली करण्याच्या प्रकरणात तो लिप्त आहे. यापूर्वी शस्त्रांच्या तस्करी प्रकरणांतही तो चर्चेत आला होता. बग्गाला असले रॅकेट चालविण्यासाठी अनेक लोक मदतही करतात. त्यांच्या संरक्षणातच तो गेल्या सहा महिन्यांपासून पोलिसांना चकमा देत होता. पोलिसांनी आपला हिसका दाखवून त्याची चौकशी केली, तर अनेकांची प्रकरणे उघडकीस येऊ शकतात. कुख्यात गुन्हेगार असणे आणि सहा महिने लोटल्याने बग्गा पोलिसांना भ्रमित करून वास्तविकता लपवत आहे.
पोलिसांनी लढवली शक्कल आणि बग्गा आला ताब्यात
बग्गाला अटक करण्यासाठी पोलिसांनी सहा महिन्यांपासून रात्रंदिवस एक केले होते. त्याअनुषंगाने पोलिसांनी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये अशा तऱ्हेने सापळा रचला होता की बग्गा ज्या हॉटेलमध्ये थांबेल, त्याची माहिती तत्काळ मिळेल. ही शक्कल कामी आली आणि २८ मे रोजी रात्री नांदेडमध्ये उपस्थित असलेल्या पोलिसांच्या टिमला एका हॉटेलमधून बग्गा निघाल्याचे कळले. त्यानंतर पोलिसांनी एका धार्मिक स्थळावर सापळा रचला. तेथेच तो हाती लागला. बग्गासोबत त्याचा एक नातेवाईकही होता.