लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर पोलिसांनी सोमवारी रात्रभरात दोन ठिकाणांहून ड्रग पेडलर्सला पकडत त्यांच्याकडून साडेतीन लाखांची एमडी पावडर जप्त केली. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक तसेच सामाजिक सुरक्षा विभाग पथकाने या दोन्ही कारवाया केल्या. या कारवाईमुळे ड्रग पेडलर्समध्ये खळबळ उडाली आहे. संबंधित माल कुठून आला याची चौकशी सुरू आहे. नंदनवन व बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या कारवाया करण्यात आल्या.सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास गुन्हेशाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथक गस्तीवर असताना नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुना बगडगंजमधील मनपा शाळेजवळ मोटारसायकलवर एक व्यक्ती एमडी पावडर घेऊन येणार असल्याची माहिती खबऱ्यांच्या माध्यमातून मिळाली. पोलिसांनी सापळा रचला व पियुष संजय बोरकर (१९, जुना बगडगंज) याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ २१.११ ग्रॅम एमडी पावडर आढळली. या पावडरची किंमत २.११ लाख इतकी आहे. त्याच्याजवळून एमडीसह मोबाईल व मोटारसायकल जप्त करण्यात आली. त्याचा साथीदार राकेश गिरी (नंदनवन झोपडपट्टी) हा घटनास्थळावरून फरार झाला. पियुषविरोधात नंदनवन पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने, सिद्धार्थ पाटील, शैलेश गोडबोले, मनोज नेवारे, विवेक आडाऊ, पवन गजभिये, राशीद शेख, सुभाष गजभिये, शेषराव रेवतकर, रोहीत काळे, अनुप काळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दुसरी कारवाई बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली. मध्यरात्रीच्या सुमारास सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक गस्तीवर असताना मधुसूदन स्वीट व लापीनोज पिझ्झा या दुकानांच्या मधील गल्लीत मोटारसायकलवर एक तरुण एमडी पावडर घेऊन उभा आहे अशी माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे जाऊन दोन तरुणांना ताब्यात घेतले. निखील जगदीश गोयंका (३३, जवाहर गेट, कोतवाली, अमरावती) व शेख शाहीद शेख अन्वर (३३, गांधीबाग) यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळून १.३८ लाख रुपये किंमतीची १३.८० ग्रॅम एमडी पावडर आढळली. त्याच्याजवळून मोबाईल व दुचाकी जप्त करण्यात आली. त्यांचा साथीदार पंकज प्रभाकर साठवणे (गोमती हॉटेलमागे, एचबी टाऊन चौक) हा फरार झाला. तिघांविरोधातही बेलतरोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक कविता ईसारकर, महेन्द्र थोटे, सचिन बडीये, प्रकाश माथनकर, अनिल अंबादे, अजय पौनिकर, शेषराव राउत, अश्विन मांगे, समीर शेख, नितीन वासने, कुणाल मसराम, कमलेश क्षिरसागर, लता गवई यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सक्करदऱ्यात ३९६ ग्रॅम गांजा जप्तदरम्यान, सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांडे प्लॉट चौक येथील राणी भोसले नगरातील विक्की रमेश दुबे (२९) याच्याकडून ३९६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. त्याचा साथीदार शुभम चक्रम (राणी भोसलेनगर) हा फरार झाला. दोघांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.