लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबईहून नागपुरात नियमित मेफेड्राॅन (एमडी)ची खेप आणणाऱ्या दोन ड्रग सप्लायर्सच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून पावणेसहा लाखांची एमडी आणि चार लाखांची कार पोलिसांनी जप्त केली.
भालदारपुऱ्यातील आरोपी सजाद उर्फ सदाम लियाकत अली हा अनेक दिवसांपासून एमडीच्या तस्करीत गुंतला असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी त्याच्याकडे नजर रोखली होती. शनिवारी तो मुंबईहून नागपुरात परत येत असल्याची माहिती मिळाल्याने गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाने अमरावती मार्गावरील वाडीतील अंबाझरी गेट क्रमांक १ जवळ सापळा लावला. सुमारे २.१४ सजाद आणि त्याचा साथीदार विवेक दिलीप सांडेकर (वय ३३, रा. तुमसर, जि. भंडारा) एका कारमध्ये तेथे येताच पोलिसांनी त्यांना रोखले आणि झडती घेतली. या वेळी त्यांच्याकडे ५७.२२ मिलिग्राम एमडी (अंदाजे किंमत ५ लाख, ७२ हजार) आढळली. ती तसेच एमएच ०२ - एक्यू ११६२ क्रमांकाची मारुती कार आणि चार मोबाइल असा एकूण १० लाख, ३४ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
५ दिवसांचा पीसीआर
आरोपींच्या विरोधात वाडी ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना २५ फेब्रुवारीपर्यंत पीसीआर मंजूर केला. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त गजानन राजमाने, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सार्थक नेहते, सहायक निरीक्षक बयाजीराव कुरळे, सुरज सुरोशे, उपनिरीक्षक बलराम झाडोकर, मयूर चाैरसिया, हवालदार राजेश देशमुख, प्रदीप पवार, समाधान गीते, नामदेव टेकाम, शिपाई नितीन मिश्रा, कपिलकुमार तांडेकर, अश्विन मांगे, समीर शेख, राहुल गुमगावकर, नितीन साळुंखे आणि राहुल पाटील यांनी ही कामगिरी बजावली.
---