नागपूर : अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली असताना देण्यात आलेल्या ‘कॅसिरिव्हीमॅब’ व ‘इमदेव्हीमॅब’ या ‘अँटिबॉडी कॉकटेल’ची ४५ इंजेक्शन्स नागपूरच्या मेडिकलला लवकरच प्राप्त होणार आहेत. या ‘कॉकटेल’मुळे कोरोनाच्या रुग्णाला रुग्णालयात जाण्याची आवश्यकता भासत नसल्याची आणि त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे वैद्यकीय सेवा उघड पडल्या. यात रेमडेसिविरसारख्या इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे रुग्णसेवा अडचणीत आली होती. प्रशासनाला यात लक्ष घालून स्वत:कडे पुरवठ्याची जबाबदारी घ्यावी लागली. परंतु या इंजेक्शनला घेऊन तज्ज्ञांमध्ये मतभिन्नता आहे. यामुळे नुकतेच अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली असताना देण्यात आलेला ‘अँटिबॉडी कॉकटेल’चा डोस चर्चेत आला. या इंजेक्शनमुळे ते लवकर बरे झाल्याने सर्वांचे लक्षही वेधले गेले. या औषधाला भारताच्या ‘केंद्रीय औषध प्रमाण नियंत्रक संस्था’ म्हणजेच ‘सीडीएससीओ’ने नुकतीच आपत्कालीन मंजुरी दिली. यामुळे देशातील आघाडीची रुग्णालये व कोविड केंद्रावर औषधी उपलब्ध करून दिली जात आहे. त्याअनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाने नागपूर मेडिकलला मंगळवारी पत्र पाठवून, पुणे येथील कार्यालयातून ‘अँटिबॉडी कॉकटेल’चे ४५ व्हायल घेऊन जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. मेडिकल प्रशासनाने त्यासंदर्भातील तयारी सुरू केली आहे.
- रुग्णालयात जाण्याची गरज पडणार नाही!
तज्ज्ञांच्या मते, या ‘कॉकटेल’ औषधीमुळे रुग्णालयात जाण्याची आवश्यकता भासत नाही, असे म्हटले जाते. असे झाल्यास, आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होण्याची शक्यता आहे. रुग्णाची परिस्थिती चिंताजनक होण्याआधीच उपचार करण्यासाठी मदत होईल. ‘अँटिबॉडी कॉकटेल’चा वापर मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी केला जाऊ शकतो. १२ वर्षांपासून पुढील वयोगटातील रुग्णांना हा डोस देता येतो. कोरोनाची गंभीर लक्षणे उद्भवत असताना हा डोस घेतल्यास यामुळे ऑक्सिजन पातळी कमी होत नाही, असे संबंधित कंपनीचे म्हणणे आहे.