नागपूर: बॉलिवूडमध्ये नशेचा जो कचरा झाला आहे, तो समाजासाठी घातक आहे, असं मत हरिद्वार येथील पतंजली योगपीठाचे संस्थापक स्वामी रामदेवबाबा यांनी व्यक्त केलं आहे. तसेच हा कचरा सर्वांनी मिळून साफ करण्याची गरज असल्याचे देखील रामदेवबाबा यांनी यावेळी सांगितलं.
'लोकमत' वृत्तपत्रसमूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त, रविवारी २४ ऑक्टोबर रोजी नागपुरात राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 'सामाजिक सौहार्द्राबाबत वैश्विक आव्हाने व भारताची भूमिका' या विषयावर या परिषदेमध्ये विविध धर्मांच्या आचार्यांच्या उपस्थितीत महामंथन होणार आहे. या परिषदेसाठी हरिद्वार येथील पतंजली योगपीठाचे संस्थापक स्वामी रामदेव यांचं आज नागपुरात आगमन झालं. त्यावेळी त्यांनी चालू घडामोडींवर आपली रोखठोक मतं मांडली.
उद्या (रविवारी) भारत-पाकिस्तानदरम्यान होणाऱ्या क्रिकेट सामन्यावरही रामदेवबाबा यांनी टीकास्त्र सोडलं आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांदरम्यान सामने होणे हे राष्ट्रहित व राष्ट्रधर्माच्या विरोधात असल्याचे मत रामदेवबाबा यांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात अंमली पदार्थप्रकरणी एनसीबी मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज पार्टी प्रकरणी आता बॉलीवूडची उद्योन्मुख अभिनेत्री अनन्या पांडे हिचीही एनसीबीकडून चौकशी सुरू झाली आहे. आर्यन खानच्या मोबाइल चॅट्समध्ये ड्रग्जच्या खरेदीबाबतची चर्चा झाल्याची माहिती एनसीबीला मिळाली आहे. त्यानुसारच एनसीबीचे अधिकारी आता वेगानं तपासाला लागले आहेत.