लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दारूच्या नशेत गोंधळ घालणाऱ्या एका तरुणाला त्याचा भाऊ आणि आईने मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. नंदनवन झोपडपट्टीत ही विचित्र व तेवढीच करुणाजनक घटना रविवारी मध्यरात्री घडली. शुभम अशोक नानोटे (वय २२) असे मृताचे नाव आहे.
शुभम नंदनवन झोपडपट्टी गल्ली नंबर २ मध्ये राहत होता. तो महाल बाजारात इमिटेशन ज्वेलरी विकायचा. त्याची आई रंजना (वय ४५) कॅटरर्सच्या कामाला जाते तर भाऊ नरेंद्र (वय २७) ईलेक्ट्रीशियन म्हणून काम करतो. शुभमला दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत तो वेड्यासारखा वागत होता.
रविवारी रात्री तो घरी आला आणि आईला पाच हजार रुपये मागू लागला. आईने त्याला पैसे नसल्याचे सांगितले. त्यावरून त्याने घरात गोंधळ घालणे सुरू केले. साहित्याची तोडफोड करून त्याने दगडाने घराची भींतही फोडण्याचा प्रयत्न केला. समजवायुला आलेल्या शेजाऱ्यांनाही तो ऐकत नव्हता. त्यामुळे आईने फोन करून शुभमचा मोठा भाऊ नरेंद्र याला बोलवून घेतले.
नरेंद्रने त्याची समजूत काढली असता तो त्याच्यावरच धावून गेला. यावेळी दोन भावांत हाणामारी झाली. त्यामुळे आईने नंदनवन ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्यावेळी धाकदपट करून तिघांनाही समज दिल्याने शुभम शांत झाला. दरम्यान, त्याला मार लागल्याचे पाहून भाऊ आणि आईने त्याला दवाखान्यात नेले. मध्यरात्री परत आल्यानंतर त्याला जेवू घातले. नंतर तो झोपी गेला.
सोमवारी सकाळी तो उठायचे नाव घेत नसल्याने आईने त्याला हलवून जागे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो उठलाच नाही. त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. दरम्यान, नंदनवन पोलिसांनी मृतदेह मेडिकलमध्ये पाठवला. गळा दाबल्यामुळे शुभमचा मृत्यू झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला. त्यामुळे नंदनवन पोलिसांनी शुभमचा भाऊ नरेंद्र आणि आई रंजना या दोघांना हत्येच्या आरोपाखाली अटक केली.
तीन आठवड्यांपूर्वीच केले होते लग्न
शुभमने २३ फेब्रुवारीला निकीता नामक तरुणीशी लग्न केले होते. त्यानंतर तो नंदनवनमधील घर सोडून निकितासोबत खरबीत राहायला गेला होता. रविवारी दारू जास्त झाल्याने तो आईच्या घरी आला अन् नंतर हा प्रकार घडला.