लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दारूच्या नशेत टून्न असलेल्या एका व्यक्तीने कारागृहाच्या टॉवरवर चढून आतमध्ये उडी घेण्याचा पवित्रा घेतला. त्याच्या या पवित्र्याने कारागृह प्रशासनाची काही वेळेसाठी मोठी तारांबळ उडाली. धावपळ करून त्याला टॉवरवरून खाली उतरवल्यानंतर पोलिसांच्या हवाली करण्यात आले. प्रकाश कोटांगळे असे त्याचे नाव आहे. तो प्रतापनगरात (स्वरूपनगर) बौद्ध विहाराजवळ राहतो.प्रकाशला दारूचे व्यसन आहे. तो सकाळपासूनच सुरू होतो. आज सकाळी त्याने अशाच प्रकारे यथेच्छ दारू घेतली. टुन्न झाल्यानंतर कारागृहाच्या मागच्या बाजूला असलेल्या टॉवरवर (तट क्रमांक १३ वर) तो चढला. कारागृहाच्या आत आणि बाहेरच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून या वॉच टॉवरचा वापर केला जातो. शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास या टॉवरवर कोणताही कर्मचारी नव्हता. ही संधी साधून प्रकाशने तट क्रमांक १३ गाठला. दरम्यान, कारागृहाच्या भिंतीलगत उंचावर एक व्यक्ती बसल्याने कारागृहातील सुरक्षा व्यवस्था सांभाळणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. कारागृह अधीक्षक राणी भोसले आणि अन्य वरिष्ठ लगेच तेथे पोहचले. तटावर बसलेली व्यक्ती वारंवार खाली उडी घेण्यासारख्या हालचाली करताना दिसल्याने कारागृह प्रशासनात घबराट निर्माण झाली. अधिकाऱ्यांनी काही सुरक्षा रक्षक बाहेरच्या भागातून तर काही सुरक्षा रक्षकांना आतल्या भागातून तटावर चढवले आणि प्रकाशला ताब्यात घेतले. त्याला सुखरूप खाली उतरवल्याचे पाहून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. प्राथमिक चौकशीत प्रकाश दारूच्या नशेत टून्न असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, कारागृहाच्या तटावर एक व्यक्ती बसल्याचे पाहून कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी धंतोली पोलिसांना माहिती कळविली होती. त्यानुसार काही वेळेतच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. तटावरून खाली उतरवलेली व्यक्ती कारागृहातील बंदिवान नसल्याचे स्पष्ट झाल्याने कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी त्याला पोलिसांच्या हवाली केले. ठाणेदार प्रसाद सनप यांनी प्रकाशची चौकशी केली. दारू उतरल्यानंतर त्याला आपल्याला ठाण्यात का आणले गेले, हेच आठवत नव्हते. त्याने केलेले कृत्य जामीनपात्र गुन्ह्याच्या स्वरूपाचे असल्याने पोलिसांनी त्याला ताकीद देऊन जामिनावर मुक्त केले.कैदी पळाल्याची अफवाकारागृहातील बंदिवान पळून जाण्याच्या प्रयत्नात भिंतीवर (तटावर) चढून बसल्याची जोरदार अफवा शहरात पसरली होती. मात्र, प्रकाशला ताब्यात घेतल्यानंतर तो बंदिवान नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कैद्याने बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही तर बाहेरच्या व्यक्तीने दारूच्या नशेत तटावर चढून आतमध्ये येण्याचा प्रयत्न केल्याचेही स्पष्ट झाले.कारागृहाची सुरक्षा व्यवस्था पुन्हा चर्चेलापोलिसांच्या चौकशीत प्रकाश मनोरुग्ण असल्याचे आणि त्याची मानसिक अवस्था बिघडली असल्याचे उघड झाले आहे. त्याने यापूर्वी एकदा गळफास लावून तर दुसऱ्यांदा विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याने एकदा वडिलांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचीही माहिती उघडकीस आली आहे. अपहरण करून आपल्याला सशस्त्र आरोपी मारणार होते, त्यामुळे आपण जीवाच्या भीतीपोटी कारागृहाच्या टॉवरवर चढल्याचे त्याने धंतोली पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान, या घटनेमुळे कारागृहाची सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा चर्चेला आली आहे.