लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : टंचाईच्या काळात दरवर्षी शेकडो बोअर जिल्ह्यात बनविण्यात येतात, पण कालांतराने त्यात बिघाड झाल्यास त्या तशाच पडून असतात. पुन्हा मग नवीन बोअरसाठी प्रस्ताव, त्यावर होणारा शासनाचा खर्च, ही प्रक्रिया दरवर्षीचीच. पण जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने यावर तोडगा काढला आहे. भिवापूर तालुक्यात झमकोली गावात बोअरवेल पुनरुज्जीवनाचा प्रयोग यशस्वी केला आहे. बंद पडलेले बोअरवेल पुन्हा रिचार्ज करून गावकऱ्यांना २४ तास पाणीपुरवठ्याची सोय करून दिली आहे.झमकोली हा संपूर्ण भाग खाणपट्ट्यातील आहे. गावात एक बोअरवेल होती आणि तीही बंद पडली होती. एक विहीर होती, मात्र ती गावाबाहेर होती. पाण्यासाठी गावकऱ्यांना १०० मीटर दूर जावे लागत होते, शिवाय पाणीही कमी मिळत होते. उन्हाळ्याच्या दिवसात तर पाण्याची समस्या बिकट व्हायची. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता नीलेश मानकर यांनी बोअरवेल पुनरुज्जीवनाचा प्रयोग येथे राबविला. बंद बोअरवेलच्या बाजूला १२० फूट पाईट टाकला. पाईपला मध्ये छिद्र पाडण्यात आले. गिट्टी, गोटे, रेतीच्या मदतीने पाईपला झाकण्यात आले. गावातील दोन घरे सिमेंट काँक्रिटची आहेत. त्या दोन छतावरील पाणी पाईपच्या खड्ड्यात सोडण्यात आले. यामुळे संपूर्ण पाईपमध्ये पाणी जमा झाले असून, आजूबाजूच्या परिसरात पाणी झिरपले. त्यामुळे बंद बोअरमध्येही पाणी आले. तिथेच एक नळ योजनाही सुरू करण्यात आली. ही नळ योजना सोलरवर चालविण्यात येत आहे. अर्ध्या एचपी मोटरच्या बाजूला दोन हजार लिटरची टँक लावण्यात आली आहे. सोलर सिस्टमच्या मदतीने टँक पाण्याने भरली जाते. यामुळे गावातील या नळाला २४ तासपाणी असते.
बंद बोअर आणि परिसराचा पूर्ण अभ्यास करण्यात आला. महिना-दीड महिन्याच्या अभ्यासानंतर हा प्रयोग करण्यात आला. याला तीन लाखाच्या जवळपास खर्च झाला. बंद बोअरवेल पुन्हा रिचार्ज झाली. पावसळ्याचे पाणी वाया जाणार नसून जमिनीत जाईल. पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार असल्याने गावाचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. अशा पद्धतीचा प्रयोग इतर ठिकाणी राबविण्यास बंद बोअरवेल कामात येईल. यामुळे नव्याने बोअर करण्याची गरज पडणार नाही.-नीलेश मानकर, उपअभियंता, यांत्रिकी विभाग, जि.प.