सुमेध वाघमारे
नागपूर : कोरडे डोळे, कोरडे तोंड, शरीरात लाळ, अश्रु, तेल आदी शरीराला ओलावा देणारे घटक तयार होण्यास अडचण येत असेल, तर हा विकार ‘स्जोग्रेन सिन्ड्रॉम’ असू शकतो. वशेष म्हणजे पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये या विकाराचे प्रमाण नऊ पटीने अधिक आहे. या विकाराकडे सर्वाधिक दुर्लक्ष होत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
‘स्जोग्रेन सिन्ड्रॉम’ हा एक ‘अॉटोइम्युन विकार’ आहे. यात स्वत:ची रोगप्रतिकारक शक्ती स्वत:वर हल्ला चढवते व स्वत:च्या पेशींना इजा करते. या विकारात शरीरात ओलावा निर्माण करणाºया ग्रंथींना इजा होते. हा विकार मुख्य करून महिलांमध्ये आढळून येतो. विशेषत: लुपस वा रुमेटॉईड आर्थरायटिससारख्या विकारांसोबत हा विकार दिसून येतो, अशी माहिती वातरोग तज्ज्ञ डॉ. तन्मय गांधी यांनी दिली.
- या लक्षणांकडे दुर्लक्ष नको
डोळे कोरडे पडणे, तोंड कोरडे पडणे, त्वचा व नाक कोरडे होणे, गळा व योनी मार्ग कोरडा पडणे, लघवी करताना जळजळ होणे, गिळतांना त्रास होणे, अशक्तपणा, स्नायु व सांधेदुखी, हात-पाय थंड पडणे (रेनॉड्स फिनॉमिनन), डिप्रेशन व चिंताग्रस्तत अशी लक्षणे दिसून येतात.
-आजाराचे निदान लक्षणांवरूनच
या विकाराचे निदान करण्यासाठी विशिष्ट चाचणी नाही. त्यासाठी शारीरिक तपासणी, लक्षणे आणि काही रक्तचाचण्या करतात. रक्त चाचण्यांमध्ये अॅन्टी न्युक्लिअर अॅन्टीबॉडी टेस्ट, रुमेटॉईड फॅक्टर, आरओ-एसएसए आणि एलए-एसएसबी अॅन्टीबॉडी चाचणी केल्या जाते.
- जीवनशैलीत बदल करा
‘स्जोग्रेन सिन्ड्रॉम’ हा काही प्रमाणात अनुवांशिक आजार आहे. या आजाराला नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य जीवनशैली आत्मसात करणे गरजेचे आहे. विशषेत: नियमीत व्यायाम, चांगली झोप, पोषक आहार, तणावाचे व्यवस्थापन याकड लक्ष देणे आवश्यक आहे.
- लिंफोमासारखे कर्करोग होण्याची शक्यता
काही रुग्णांमध्ये ‘स्जोग्रेन’ची मध्यम लक्षणे असतात व ती सहजतेने नियंत्रणात येतात. हा दीर्घकाल चालणारा विकार असून याला नियंत्रणात आणण्यासाठी दीर्घकाळ व नियमित औषधोपचार करावे लागतात. याकडे दुर्लक्ष केल्यास ‘लिंफोमा’सारखे कर्करोग आदी विकार होण्याची शक्यता बळावते.
- डॉ. तन्मय गांधी, वातरोग तज्ज्ञ