लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात शनिवारी होणाऱ्या कोरोना लसीकरणासाठी मनपा प्रशासन सज्ज झाले आहे. शहरात पाच केंद्रावर लसीकरण केले जाणार आहे. नोंदणी झालेल्या २२ हजार ५०० आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी १० हजार कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यात लस देण्यात येणार आहे. याची पूर्वतयारी म्हणून गुरुवारी दुपारी २ ते ३ या वेळात शहरातील १० केंद्रांवर लसीकरणाची ‘ड्राय रन’पार पडली.
यासाठी प्रत्येक केंद्रावर १० आरोग्य कर्मचारी लसीकरणासाठी बोलविण्यात आले होते. केंद्र शासनाच्या दिशानिर्देशानुसार लसीकरण केंद्रामध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. लसीकरणाचे जे-जे टप्पे आहेत, त्यानुसार निवड झालेल्या कर्मचाऱ्यांची ‘ड्राय रन’ घेण्यात आली.
नागपुरातील महाल रोगनिदान केंद्र, पारडी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, कल्पवृक्ष हॉस्पिटल, मेहंदीबाग नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, जाफरी हॉस्पिटल, आयसोलेशन हॉस्पिटल, पाचपावली सुतिकागृह, इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि फुटाळा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी ही ड्राय रन पार पडली. फुटाळा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राला महापौर दयाशंकर तिवारी यांनी भेट देऊन संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली.
....
अशी पार पडली ‘ड्राय रन’
आरोग्य विभागातर्फे लसीकरणासाठी निवड करण्यात आलेल्या व्यक्तींना संदेश प्राप्त झाले होते. लसीकरणासाठी बोलविण्यात आलेल्यांचे तापमान तपासण्यात आले. हात सॅनिटाईज करण्यात आले. त्यांना टोकन नंबर देऊन केंद्रातील प्रतीक्षा कक्षात त्यांना पाठविण्यात आले. टोकन क्रमांकानुसार व ओळखपत्राच्या आधारे संबंधित व्यक्ती तोच असल्याची खातरजमा करण्यात आली. ओटीपीच्या आधारे त्यांना लसीकरणासाठी पात्र ठरविण्यात येत होते. यानंतर लसीकरण अधिकाऱ्याकडे त्यांना पाठविण्यात आले. लस कोणत्या कंपनीची आहे, लसीकरणानंतर काय नियम पाळायचे आहेत, पुढील लस कधी देणार, याची माहिती देण्यात आली. घरी गेल्यावर काही अडचण आल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांना अथवा १०८ या टोल फ्री क्रमांकावर फोन करून माहिती देण्यास सांगितले.
....