लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेशोत्सव म्हणजे सळसळत्या उत्साहाचे पर्व. या काळात जागोजागी सजावट आणि वेगवेगळ्या पक्वान्नांचा दरवळ सर्वत्र पसरला असतो. पण या उत्साहात आनंद देतो तो बाप्पाचा आवडता मोदक. श्रीगणेशालाही या मोदकाची खास आवड आणि त्याचे आवडते भोग अर्पण करण्याचा भक्तांनाही मनस्वी आनंद. बाप्पाच्या आगमनात हा आनंद आणखी द्विगुणित केला तो बाजारातील वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांनी. नानाविध प्रकारचे हे मोदक सर्वांचे लक्ष वेधत असून बाप्पाला रोज वेगवेगळ्या मोदकांचा आस्वाद मिळत आहे.विशिष्ट आकार असलेले हे मोदक तसे सर्वांनाच भावणारे पण त्यात वेगवेगळ्या पदार्थाचे फ्लेवर घालून त्याचा स्वाद मिठाई निर्मात्यांनी अधिकच चवदार केला आहे. याच पदार्थांच्या नावाने मोदकांचेही नामकरण झाले आहे. सर्वसाधारणपणे सुके (ड्राय) मोदक आणि पुरण मोदक हे सर्वाधिक चलनात असलेले प्रकार पण आता नव्या प्रकारांनीही भाविकांचे लक्ष वेधले आहे. यामध्ये ‘चुरमा मोदक’, ‘मसाला मोदक’, सुक्या मेव्यापासून निर्मित ‘ड्रायफ्रुट मोदक’, चॉक लेटचा स्वाद असलेले ‘चॉकलेट मोदक’ व याबरोबर केसरी मोदक, मलाई मोदक हेही खास आकर्षण ठरले आहेत. फळांचे फ्लेवर असलेले मँगो मोदक, आॅरेंज मोदक, कोकोनट मोदक आणि काजू मोदकांनी या स्वादात भर घातली आहे. शहरात आणखी प्रकारचे मोदकही भाविकांच्या पसंतीस पडत आहेत. देशातील विविध भागात प्रचलित असलेल्या मोदकांनाही खास मागणी आहे. विशेषत: त्या त्या प्रदेशात राहणाऱ्या रहिवाशांकडून मागणी केली जाते. बंगाली नागरिकांचा सोंदेश मोदक लक्ष वेधून घेतो.गणेशोत्सव हा विशेषत: मध्यमवर्गीय कुटुंबांचा लाडका देव मानला जातो. त्यामुळे मोदकांचे भावही सर्वसामान्य माणसांच्या अवाक्यात राहतील याची काळजी मिठाई दुकानदारांनी घेतल्याचे दिसते. ३८० रुपये किलोप्रमाणे ड्राय मोदक व ३९९ रुपये किलोप्रमाणे पुरण मोदकांपासून ५२४ रुपये किलोप्रमाणे चॉकलेट तर सर्वाधिक ८८० रुपये किलोप्रमाणे सुका मेव्याचे मोदक भक्तांना आवडत आहेत.राम भंडारचे शंभू सोनी यांनी सांगितल्याप्रमाणे भाविक दररोज वेगवेगळ्या प्रकारचे मोदक नेऊन बाप्पाला अर्पण करताना दिसतात. आपल्या शक्तीप्रमाणे कुणी एक पाव तर कुणी अर्धा किलो वेगवेगळ्या प्रकारचे मोदक दररोज खरेदी करतो. शहरात दररोज अडीच हजार किलोच्यावर मोदकांची खरेदी भाविकांकडून होत असल्याचे सोनी यांनी सांगितले. अनेक भाविक श्रद्घापूर्वक आपल्या घरीच मोदक तयार करून बाप्पाला देत असल्याचेही दिसून येते. त्यामुळे सर्व प्रकारचे पदार्थांची उलाढाल लक्षात घेता या गणेशोत्सव काळात बाजारातही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
निरोपाच्या वेळी मोदकांची शिदोरीदीड दिवस, पाच दिवस किंवा दहा दिवस बाप्पाला घरी विराजमान केल्यानंतर निरोपाची वेळ प्रत्येकांसाठी भावनिक असतो. श्रीगणेशालाही निरोपाच्या वेळी मोदकांची शिदोरी बांधून देण्याची भावनिकता दिसून येत आहे. नवीन स्वच्छ कापडात मोदकांची शिदोरी बांधून दिली जाते.