लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुरेसा पाणीसाठा नसल्याने शहरात जलसंकटाची भीती निर्माण झाली आहे. याबाबत सध्याची स्थिती व उपाययोजना यावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु कौेटुंबिक कारणामुळे ऐनवेळी नवनियुक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे शहराबाहेर असल्याने सभा स्थगित करण्याचा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला. पाण्यावरील विशेष सभा ७ डिसेंबर रोजी पुन्हा घेण्याचा निर्णय सुद्धा यावेळी घेण्यात आला.शुक्रवारी विशेष सभा सुरू झाली, तेव्हा आयुक्तांच्या खुर्चीवर अपर आयुक्त राम जोशी बसले होते. यावर अपक्ष नगरसेविका आभा पांडे म्हणाल्या, पाण्याारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा बोलावण्यात आली. अशावेळी आयुक्त अभिजित बांगर, अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, पाणीपूरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप राजगिरे सभेत उपस्थित नाहीत. तेव्हा चर्चा करून फायदाच काय. आपसात चर्चा करून कुठलेही समाधान निघणार नाही. वरिष्ठ अधिकारी राहिले तर सूचनांवर अंमलबजावणी होऊ शकेल. सत्तापक्षाची प्रशासनावर पकड नसल्यानेच ही परिस्थिती ओढवल्याचा आरोपही पांडे यांनी केला.आभा पांडे यांच्या म्हणण्याचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनीही समर्थन केले.ते म्हणाले, चर्चेतून निघालेल्या निष्कर्षावर अंमलबजावणी व्हायला हवी. उन्हाळ्यात पाण्याची समस्या निर्माण व्हायला नको.अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेदरम्यान ज्या सूचना येतील त्यावर अंमल करणारे अधिकारी असल्यास फायदा होईल. त्यामुळे ही सभा स्थगित करण्यात यावी. सत्तापक्षानेही ही सूचना मान्य केली. सत्तापक्ष नेते संदीप जोशी म्हणाले, भाजपाचे अनेक नगरसेवक पाणी संकटापासून वाचण्यासाठी उपाययोजना सुचविणार आहेत. वरिष्ठ अधिकारी नसल्याने अंमलबजावणी होऊ शकणार नाही. तेव्हा विशेष सभेची तारीख पुढे ढकलण्यात यावी. यामुळे विशेष सभेची तारीख सर्वसंमतीने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यत आला.केवळ ३२ सदस्य होते उपस्थितविशेष सभेसाठी सकाळी ११ वाजताची वेळ निश्चित करण्यात आली होती. सदस्यांची संख्या फारच कमी असल्याने सभा थोडी उशिरा सुरु करण्यात आली. तेव्हा केवळ ३२ नगरसेवक उपस्थित होते. सभागृहातील सदस्यांच्या संख्येबाबतही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहे. सभा स्थगित झाल्यानंतरही अनेक सदस्य नगरसेवक महाल येथील टाऊन हॉलवर सभेसाठी येत होते.