लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: भिवापूर तालुक्यात बोअरवेल्समधील क्षारयुक्त पाणी प्यायल्याने नागरिकांना चार दिवसांतच हगवण, ओकारी, पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे शहरात सध्या घरोघरी या आजाराचे रुग्ण बघावयास मिळत आहेत.भिवापूर व परिसरातील भूगर्भात मुबलक जलसाठा आहे. मात्र, त्या पाण्यात मोठ्या प्रमाणात क्षार असल्याने ते पिण्यायोग्य नाही. शहराला ११ योजनांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात असून, या सर्वच योजनांची दयनीय अवस्था आहे. मोखाळा, चिखली व मरूनदी या तीन प्रमुख्य पाणीपुरवठा योजनांपैकी मोखाळा योजना लोकप्रतिनिधीच्या ढिसाळ धोरणाची बळी ठरली. उर्वरित दोन योजना कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शहराला वर्षभर कृत्रिम पाणीटंचाईची झळ सोसावी लागते.ही समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने शहरातील विविध भागात एकूण ११० बोअरवेल्स तयार करण्यात केल्या असून, यातील ८५ बोअरवेल्समधील पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी न करता ते नागरिकांना पिण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले. परिणामी, अवघ्या चार दिवसांत नागरिकांनी या बोअरवेल्समधील क्षारयुक्त पाणी प्यायल्याने हगवण, उलटी आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. या आजाराचे घरोघरी रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने या बोअरवेल्समधील पाणीपुरवठा बंद केला आणि पाण्याचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले.सध्या शहरातील माळीपुरा, धर्मापूर, आझाद चौक, कुंभारपुरा, धर्मापूर या भागात हगवण, उलट्या व पोटदुखीचे रुग्ण अधिक असल्याचे दिसून येते. यात लहान मुले आणि वयोवृद्धांची संख्या अधिक आहे. परिणामी, प्रशासनाचा पाणीटंचाईवर मात करण्याचा हाही प्रयत्न फसला आहे.
लाखो लिटर पाण्याची नासाडीरुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्या बोअरवेल्समधील पाणी पिण्यायोग्य नसल्याचे प्रशासनाच्या व नागरिकांच्या लक्षात आले. यावर उपाय म्हणून प्रशासनाने त्या बोअरवेल्समधील पाण्याचा उपसा करायला सुरुवात केली. त्यासाठी बोअरवेल्समधील मोटरपंप ४८ तासांपासून सुरू आहे. परिणामी, बोअरवेल्समधील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होत असून, लाखो लिटर पाणी वाहून वाया जात आहे. मात्र, क्षारयुक्त पाणी शुद्ध करण्याचा हा उपाय नाही, असे जाणकारांनी सांगितले.
कायमस्वरूपी तोडगा काढाभिवापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्वच योजनांचे बारा जले आहेत. काही योजना कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत. उन्हाळा तोंडावर असतानाच शहराला पाणीटंचाई जाणवू लागली. ही समस्या फार जुनी आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी समस्या सोडविण्याऐवजी आरोप प्रत्यारोप करण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे या पाणीसमस्येवर आतातरी कायमस्वरूपी तोडगा काढा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पाणीसमस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्षशहराला होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे प्रभाग क्रमांक - १६ मध्ये ‘टायफाईड’ व ‘किडनी स्टोन’चे रुग्ण वाढले आहेत. याबाबत नागरिकांनी ६ आॅक्टोबर, १६ व १८ नोव्हेंबर २०१७ रोजी नगरपंचायत प्रशासनाकडे लेखी तक्रारी दिल्या. दोन वर्षांपासून या गंभीर समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नगरसेविका वंदना जांभुळकर यांनी करीत नगरपंचायत प्रशासनाला नुकतेच निवेदन दिले. या निवेदनासोबत त्यांनी लोकमतमध्ये पाणीटंचाईबाबत २४ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रकाशित वृत्तही जोडले.