नागपूर : जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावातील पाणीसमस्या दूर व्हावी,यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात बोअरवेलची कामे मोठ्या प्रमाणात केली जातात. ती तातडीने होण्याची गरजही असते. परंतु जिल्हा परिषदेतील कंत्राटदारांच्या मनमानीमुळे वर्षभरापासून बोअरवलेची कामे बंद आहेत. पाणीपुरवठा विभागाने यावर तातडीने निर्णय न घेतल्यास जिल्ह्यातील अनेक गावात पाण्याचा प्रश्न तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टंचाई निवारण आराखड्यात बोअरवलेची कामे प्रस्तावित केली जातात. तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र, शाळा आदी ठिकाणी बोअरवेलच्या माध्यमातून पाण्याची सुविधा केली जाते. गेल्या वर्षात जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केद्र व उपकेंद्रात २२० बोअरवेलची कामे मंजूर आहेत. परंतु वर्षभपासून ती प्रलंबित असून यासाठी तरतूद करण्यात आलेला निधी अखर्चित आहे. मुख्यकार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी बोअरवेलची कामे न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला आहे. परंतु पदाधिकारी मात्र कंत्राटदारांना पाठीशी घालत असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)
कंत्राटदारांच्या मनमानीमुळे बोअरवेलची कामे बंद
By admin | Published: April 08, 2015 2:41 AM