लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिंगणा एमआयडीसी येथील उद्योगांतील रासायनिक पाणी व वाडी येथील नागरी वस्त्यांमधील सांडपाणी अंबाझरी तलावात मिसळते. त्यामुळे तलावातील हजारो मासे मृत्युमुखी पडले असे प्रतिज्ञापत्र महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केले आहे. यासंदर्भात संबंधितांना नोटीस बजावूनही काहीच उपाययोजना करण्यात आल्या नाही असेदेखील प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.याविषयी उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. न्यायालयाने वृत्तपत्रांतील बातम्यांची दखल घेऊन ही याचिका स्वत:च दाखल करून घेतली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने महापालिकेचे प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, वाडी नगर परिषद व एमआयडीसी औद्योगिक संघटना यांना उत्तर सादर करण्यासाठी २६ जूनपर्यंत वेळ वाढवून दिला.नागपुरातील वैशिष्ट्यांमध्ये अंबाझरी तलावाचा समावेश होतो. हा तलाव आपल्या सौंदर्यामुळे सर्वत्र लोकप्रिय आहे. तसेच, या परिसरात उभारण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद स्मारकामुळे हे स्थळ पर्यटकांचे आकर्षण केंद्र झाले आहे. परंतु, गेल्या महिन्यात अचानक तलावातील हजारो मासे मृत्युमुखी पडले. तलावाच्या काठावर मृत माशांचा ढीग साचला. दरम्यान, हिंगणा एमआयडीसी येथील उद्योगांतील रासायनिक पाणी व वाडी येथील नागरी वस्त्यांमधील सांडपाणी माशांच्या मृत्यूकरिता कारणीभूत असल्याचा आरोप पर्यावरणमित्रांनी केला होता. तसेच, शहरातील वृत्तपत्रांनी हा विषय लावून धरला होता. त्यानंतर उच्च न्यायालयानेही यावर जनहित याचिका दाखल करून घेतली. महापालिकेच्यावतीने अॅड. सुधीर पुराणिक यांनी कामकाज पाहिले.
रासायनिक पाण्यामुळे अंबाझरी तलाव दूषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 9:06 PM
हिंगणा एमआयडीसी येथील उद्योगांतील रासायनिक पाणी व वाडी येथील नागरी वस्त्यांमधील सांडपाणी अंबाझरी तलावात मिसळते. त्यामुळे तलावातील हजारो मासे मृत्युमुखी पडले असे प्रतिज्ञापत्र महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केले आहे. यासंदर्भात संबंधितांना नोटीस बजावूनही काहीच उपाययोजना करण्यात आल्या नाही असेदेखील प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.
ठळक मुद्देमहापालिकेचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र : इतरांना उत्तर सादर करण्याचे निर्देश