लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : सततच्या पावसामुळे कामठी तालुक्यातील शेवटच्या टप्प्यात असलेले साेयाबीनचे पीक खराब झाले आहे. या प्रकारामुळे तालुक्यात साेयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट येणार असल्याची शक्यताही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. दुसरीकडे, शासनाने या नुकसानग्रस्त शेतातील पिकाचा पंचनामा करून याेग्य नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.
कामठी तालुक्यात यावर्षी साेयाबीनच्या पेरणी क्षेत्रात वाढ झाली हाेती. यावर्षी तालुक्यात एकूण ३,८३४ हेक्टरमध्ये साेयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. सुरुवातीच्या काळात व मध्यंतरी साेयाबीनच्या पिकांची अवस्था उत्तम हाेती. चांगली फूल व फलधारणा झाल्याने साेयाबीनचे बऱ्यापैकी उत्पादन हाेणार असल्याची आशाही शेतकऱ्यांच्या मनात पल्लवित झाली हाेती.
दरम्यान, काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तसेच पाण्याचा वेळीच निचरा न झाल्याने आठवडाभरात साेयाबीनचे पीक पिवळे पडायला व काही भागात सडायला सुरुवात झाली आहे. फलधारणा झालेल्या पिकाच्या शेंगा काळवंडल्या असून, त्या सडून गळत आहे. तर फुलावर असलेले पिकाचा बहारही गळाला आहे. त्यामुळे या साेयाबीनला फलधारणा हाेण्याची शक्यता मावळली आहे.
या प्रकारामुळे तालुक्यातील बहुतांश साेयाबीन उत्पादक हवालदिल झाले आहे. शासनाने या संपूर्ण नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे करावे तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी खैरीचे सरपंच मोरेसर कापसे, लिहीगावचे सरपंच गणेश झोड, घोरपडच्या सरपंच तारा कडू, येरखेड्याच्या सरपंच मंगला कारेमोरे, रनाळ्याच्या सरपंच सुवर्णा साबळे, नेरीचे सरपंच अरुण आखरे, खेडीच्या सरपंच भारती देवगडे, आडक्याच्या सरपंच भावना चांभारे, वडाेद्याच्या सरपंच वनिता इंगोले, खसाळ्याचे सरपंच रवी पारधी, भमेवाड्याच्या सरपंच सविता फुकट, आवंढीच्या सरपंच शालू मोहोड, नेरीचे माजी सरपंच डुमदेव नाटकर यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
...
उत्पादन खर्च वाढला
यावर्षी साेयाबीनच्या पिकावर मध्यंतरी राेग व किडींचा प्रादुर्भाव झाला हाेता. या राेग व किडींच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांना महागड्या कीटकनाशकांची फवारणी करावी लागली हाेती. प्रत्येक शेतकऱ्याने साेयाबीनच्या पिकावर दाेन ते तीन फवारण्या केल्या आहेत. त्यातच मुसळधार पावसामुळे संपूर्ण पीक सडल्यागत झाले आहे. त्यामुळे एकीकडे उत्पादनखर्च वाढला असून, उत्पादनात कमालीची घट हाेणार आहे. यावर्षी साेयाबीनचा उत्पादनखर्च भरून निघणार नाही, असेही शेतकऱ्यांनी सांगितले.
...
साेयाबीनचे घटते क्षेत्र
सात वर्षापूर्वी कामठी तालुक्यात १० हजार हेक्टरमध्ये साेयाबीनची पेरणी करण्यात आली हाेती. त्यानंतर राेग व किडींचा प्रादुर्भाव तसेच परतीच्या पावसामुळे साेयाबीनच्या पिकांचे नुकसानीचे प्रमाण वाढत गेले. त्यामुळे तालुक्यातील साेयाबीनचा पेरा कमी हाेत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी साेयाबीन पेरणी क्षेत्र थाेडे वाढले हाेते. मात्र, सततच्या मुसळधार पावसामुळे आठवडाभरात पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
...
सुरुवातीच्या काळात पिकाची अवस्था चांगली हाेती. सततच्या मुसळधार पावसामुळे तसेच जमिनीत पाण्याचा वेळीच याेग्य निचरा हाेत नसल्याने पिकाची मुळे सडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे झाडाची पाने पिवळी पडून शेंगा गळत आहे.
- मंजुषा राऊत,
तालुका कृषी अधिकारी, कामठी.