नागपूर : वाढत्या महागाईत केंद्र सरकारने काही महिन्याआधी पेट्रोलचे दर प्रति लिटर सहा रुपयांनी कमी केले असले तरीही पेट्रोल पंपावर ग्राहकांना साधे पेट्रोल अजूनही १०९.६८ रुपये लिटरने घ्यावे लागते. खरेदी करताना महागाईवर ग्राहकांची कुरकुर सुरूच असते. तर त्याचवेळी पंपावर साधे पेट्रोल उपलब्ध नसून ११३.९४ दरातील प्रीमियम पेट्रोल खरेदी करावे लागेल, अशी सूचना पेट्रोल भरणारा करतो, तेव्हा ग्राहकांना प्रचंड मनस्ताप होतो. दुसरीकडे पेट्रोलियम कंपन्यांच्या दबावाखाली पंपचालक प्रीमियम पेट्रोल ग्राहकांच्या माथी मारत असल्याचे एका पाहणीतून समोर आले आहे.
सर्वच पेट्रोलियम कंपन्यांचा पंपचालकांना प्रीमियम पेट्रोल विकण्याचा दबाब आहे. केवळ २ टक्केच दुचाकी व कारचालक स्वत:हून त्या त्या कंपन्यांचे प्रीमियम पेट्रोल गाडीत भरतात. अशावेळी टँकरने पंपावर आलेले प्रीमियम पेट्रोल विकणार कसे, असा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. कंपन्यांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी पंपचालक साधे पेट्रोल उपलब्ध नाही किंवा वेगळी युक्ती वापरून प्रीमियम पेट्रोलची विक्री करतो. ही बाब कंपन्यांच्या दबावाखाली संपूर्ण शहरात सुरू असल्याचे एका पंपचालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. प्रीमियम पेट्रोलच्या उपयोगाने कार जास्त मायलेज देते आणि साध्या पेट्रोलच्या तुलनेत कमी प्रदूषण होत असल्याचा कंपन्यांचा दावा आहे. त्यानंतरही ९८ टक्के ग्राहक साध्या पेट्रोलला प्राधान्य देत असल्याचे एका पाहणीत आढळून आले आहे.
प्रीमियम पेट्रोल ४.२३ रुपयांनी महाग
शहरातील विविध कंपन्यांच्या पेट्रोल पंपावर विशिष्ट नावाने प्रीमियम पेट्रोल उपलब्ध आहे. इंडियन ऑईलचे साधे पेट्रोल १०९.७१ रुपये, एक्स्ट्रा प्रीमियम ९५ ऑक्टेन पेट्रोलचे दर ११३.९४ रुपये लिटर आहे. प्रीमियम पेट्रोल ४.२३ रुपयांनी महाग आहे. तर हिंदुस्थान पेट्रोलियमचे साधे पेट्रोल १०९.६८ रुपये तर पॉवर ११३.४८ रुपये आणि भारत पेट्रोलियमचे साधे पेट्रोल १०९.७२ रुपये आणि स्पीड ११२.५३ रुपये आहे. साध्या आणि प्रीमियम पेट्रोलच्या भावात मोठी तफावत असल्यामुळे लोकांचा साधे पेट्रोल खरेदीकडे जास्त कल आहे. हीच बाब डिझेलच्या बाबतीतही आहे.
साधे व प्रीमियम पेट्रोलचे प्रति लिटर दर :
कंपनी साधे प्रीमियम
इंडियन १०९.७१ ११३.९४
एचपी १०९.६८ ११३.४३
भारत १०९.७२ ११२.५३