राकेश घानोडे।आॅनलाईन लोकमतनागपूर : अपघातात ठार झालेल्या शेतकऱयांकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हते म्हणून विमा दावा खारीज करण्याचा ओरिएंटल इंशुरन्स कंपनीचा निर्णय अवैध ठरवून रद्द करण्यात आला आहे. अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच ने हा महत्त्वपूर्ण निर्वाळा दिला आहे. शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेमध्ये मे-२००९ पूर्वी विमाधारकाकडे ड्रायव्हिंग लायसन्स असण्याची अट नव्हती. परिणामी, त्यापूर्वीच्या विमाधारकांचा दावा ड्रायव्हिंग लायसन्स नसल्यामुळे फेटाळता येणार नाही असे मंचाने स्पष्ट केले आहे. या खुलाशामुळे समान प्रकरण असलेल्या राज्यातील असंख्य शेतकऱयांचे विमा दावे कंपनीला मंजूर करावे लागणार आहेत.राज्य शासनाने २००८ मध्ये शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना लागू केली होती. त्यावेळी विमा दावा मंजूर होण्यासाठी विमाधारक शेतकऱयांकडे ड्रायव्हिंग लायसन्स असण्याची अट नव्हती. त्यामुळे शासन निर्णय दुरुस्तीसाठी २९ मे २००९ रोजी शुद्धिपत्रक जारी करण्यात आले. त्याद्वारे विमाधारक शेतकऱयांचा तो स्वत: वाहन चालवित असताना अपघात होऊन मृत्यू झाल्यास विमा दावा मंजूर होण्यासाठी त्याचे वैध ड्रायव्हिंग लायसन्स सादर करणे बंधनकारक करण्यात आले. राज्यघटनेनुसार कोणताही कायदा किंवा नियम पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येत नाही. परंतु, ही योजना राबविण्याची जबाबदारी असणाºया ओरिएंटल इंशुरन्स कंपनीने निर्णयातील दुरुस्ती पूर्वलक्षी प्रभावाने लागू करून मे-२००९ आधी अपघातात मृत्यू झालेल्या विमाधारक शेतकऱयांचा विमा दावा त्याचे वैध ड्रायव्हिंग लायसन्स नव्हते म्हणून खारीज केला होता. त्याविरुद्ध संबंधित शेतकऱयांच्या वारसदाराने ग्राहक मंचात तक्रार दाखल केली होती. मंचाचे अध्यक्ष शेखर मुळे व सदस्या चंद्रिका बैस यांनी ही तक्रार अंशत: मंजूर करून वरीलप्रमाणे निर्वाळा दिला.पूर्वी हेच कागदपत्रे अनिवार्य होतेया योजनेंतर्गत विमा दावा मंजूर होण्यासाठी पूर्वी प्रथम खबरी अहवाल, स्थळ पंचनामा, इनक्वेस्ट पंचनामा, शवविच्छेदन अहवाल व मृत्यू प्रमाणपत्र एवढीच कागदपत्रे सादर करणे आवश्यक होते. त्यानंतर शासनाने २९ मे २००९ रोजी शुद्धिपत्रक काढून त्यात ड्रायव्हिंग लायसन्सचा समावेश केला.वारसदाराला एक लाख मंजूरपांडुरंग गोंधुळे असे विमाधारक मयत शेतकऱयाचे नाव होते. ते कुही तालुक्यातील सावंगी येथील रहिवासी होते. त्यांचा २७ मे २००९ रोजी अपघाती मृत्यू झाला. मंचाने त्यांच्या वारसदाराला विमा दाव्याचे एक लाख रुपये व त्यावर २४ जून २००९ पासून ९ टक्के व्याज देण्याचा आदेश ओरिएंटल इंशुरन्स कंपनीला दिला आहे. तसेच, विमा दावा मिळविण्यासाठी वारसदाराला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाचा मोबदला म्हणून १० हजार रुपये व तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार रुपये देण्याचे निर्देशही कंपनीला दिले आहेत.
ड्रायव्हिंग लायसन्स नसल्यामुळे विमा नाकारण्याचा निर्णय रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:28 PM
अपघातात ठार झालेल्या शेतकऱयांकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हते म्हणून विमा दावा खारीज करण्याचा ओरिएंटल इंशुरन्स कंपनीचा निर्णय अवैध ठरवून रद्द करण्यात आला आहे. अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच ने हा महत्त्वपूर्ण निर्वाळा दिला आहे.
ठळक मुद्देग्राहक मंचाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा राज्यातील असंख्य शेतकऱ्यांना मिळेल लाभ