निवडणुकांमुळे भाजप-संघाला ‘राम’आठवला : मल्लिकार्जुन खर्गे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 08:57 PM2018-12-01T20:57:28+5:302018-12-01T21:05:26+5:30

राममंदिराचा मुद्दा न्यायालयात असल्याने त्यावर बोलणे योग्य होणार नाही. न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य करावा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा कारभार चालवित आहेत. गेल्या साडेचार वर्षांच्या सत्ताकाळात त्यांना राममंदिराचा मुद्दा महत्त्वाचा वाटला नाही. आता तीन महिन्यावर निवडणुका आल्याने मताचे ध्रुवीकरण करण्यासाठी भाजपा व संघाला ‘राम’ आठवल्याची घणाघाती टीका लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी केली.

Due to elections, the BJP and RSS have been remembered the 'Ram' | निवडणुकांमुळे भाजप-संघाला ‘राम’आठवला : मल्लिकार्जुन खर्गे

निवडणुकांमुळे भाजप-संघाला ‘राम’आठवला : मल्लिकार्जुन खर्गे

googlenewsNext
ठळक मुद्दे मसीही अधिकार संमेलनात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याची भावना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राममंदिराचा मुद्दा न्यायालयात असल्याने त्यावर बोलणे योग्य होणार नाही. न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य करावा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा कारभार चालवित आहेत. गेल्या साडेचार वर्षांच्या सत्ताकाळात त्यांना राममंदिराचा मुद्दा महत्त्वाचा वाटला नाही. आता तीन महिन्यावर निवडणुका आल्याने मताचे ध्रुवीकरण करण्यासाठी भाजपा व संघाला ‘राम’ आठवल्याची घणाघाती टीका लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी केली.
ख्र्रिश्चन को-आॅर्डिनेशन कमिटी नागपूरतर्फे मेकोसाबाग येथील मैदानावर आयोजित मसीही अधिकार संमेलनात खर्गे बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, काँग्रेसचे सचिव आशिष दुवा, अखिल भारतीय अल्पसंख्य आघाडीचे उपाध्यक्ष अ‍ॅड. अली थॉमस, प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष चारुलता टोकस, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, माजी खासदार गेव्ह आवारी, माजी मंत्री अनिस अहमद, आ. अशिष देशमुख, बबनराव तायवाडे, नितीन सरदार आदी उपस्थित होते.
देशाच्या स्वातंत्र्यात काँग्रेसचे मोठे योगदान आहे. महात्मा गांधी यांना हा देश सर्वधर्मियांचा असल्याचे म्हटले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सर्व घटकांना न्याय दिला. देशाचा कारभार संविधानाच्या माध्यमातून चालावा. संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपण सर्वांचीच आहे. संरक्षण करताना कुणाला काहीच मिळाले नाही तरी बलिदानाची तयारी ठेवा. ख्रिश्चन मिशनरीने देशाच्या सर्व भागात शिक्षण व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देशाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी शिक्षणाचा अधिकार दिला.परंतु आज केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात आरोग्य व शिक्षणासाठी तरतूद नाही. पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना न मिळता मोठ्या कंपन्यांनाचा होत आहे. भाजपाचा सबका साथ सबका विकासाचा नारा असला तरी मूठभर कार्पोरेट कंपन्याच्या भल्यासाठी केंद्र सरकार धोरणे राबवित असल्याचा आरोप खर्गे यांनी केला.
केंद्र सरकारचा सर्वच क्षेत्रात हस्तक्षेप सुरू आहे. कुणी विरोध केला तर सीबीआय, आयकर व ईडीची चौकशी लावली जाते. यामुळे देशात भीतीचे वातावरण आहे. हिंदू धर्मात असे कुठेही म्हटलेले नाही की दुसऱ्या धर्मावर अन्याय करा. पण आज देशात धर्माच्या नावावर अत्याचार सुरू आहे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी देशभरात फिरून याचा मुकाबला करीत आहेत. देशाचे संविधान सुरक्षित असेल तर देश सुरक्षित राहील. यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येण्याची गरज असल्याचे खर्गे म्हणाले.
अनिल थॉमस यांनी प्रास्ताविकातून मसीही समाज आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याने अन्य समाजाप्रमाणे सुविधा मिळण्याची मागणी केली. नितीन सरदार यांनी संमेलनाची माहिती दिली. यावेळी धर्मगुरु पॉल दुपारे, अनंतराव घारड, माजी आमदार सेवक वाघाये, डॉ. अमोल देशमुख, अ‍ॅड. अभिजित वंजारी, सतीश मेहंदे, उमाकांत अग्निहोत्री, प्रा. विजय बारसे, शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, यांच्यासह पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाला राज्यभरातून ख्रिश्चन बांधव आले होते. 


२०१९ देशात व राज्यात काँग्रेसचीच सत्ता -अशोक चव्हाण
देशातील परिस्थिती विचारात घेता अल्पसंख्यक समुदायात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संविधानाच्या रक्षणासाठी या विरोधात संघटित होऊन मुकाबला करावा लागेल. काँग्रेस तुमच्या पाठिशी आहे. २०१९ च्या निवडणुकीत देशात व राज्यात काँग्रेसचीच सत्ता येईल, असा ठाम विश्वास प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.
भगवान येशू ख्रिस्तांनी बंधूभावाचा संदेश दिला. ख्रिश्चन समाज या देशाचा अविभाज्य घटक आहे. सामाजिक सलोखा व देशाच्या विकासात या समाजाचाही वाटा आहे. मदर तेरेसा यांचे नाव जगाला माहीत आहे. त्यांनी धर्मनिरपेक्षा भावनेतून समाजाची सेवा केली. नागपुरात काँग्रेसचे दिवंगत नेते एन.पी.के.साळवे यांचे शिक्षण क्षेत्रात योगदान आहे.स्वातंत्र्य लढ्यातही या समाजाचे योगदान आहे. असे असूनही भाजपाचे नेते गोपाल शेट्टी म्हणतात ख्रिश्चन समाजाचे योगदान नाही. हे त्यांचे अज्ञान असल्याचे चव्हाण म्हणाले.

Web Title: Due to elections, the BJP and RSS have been remembered the 'Ram'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.