लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणाचा वाढता दुष्प्रभाव आणि त्यामुळे सततच्या टाळेबंदीमुळे उत्पन्नाचे मार्ग बंद झाल्याने नैराश्येतून शहरातील एका होतकरू युवा कलावंताने टोकाचा निर्णय घेत डास मारण्याचे औषध पिऊन आपली जीवनलीला संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुटुंबीयांच्या सतर्कतेने वेळीच त्याला इस्पितळात दाखल करण्यात आले आणि त्याचा जीव वाचला.
यश मदनकर (२२, रा. मानेवाडा) हा युवा कलावंत ऑर्केस्ट्रामध्ये ड्रमवादक आहे. गेल्या सात-आठ वर्षात त्याने संगीत क्षेत्रात चांगले नाव कमावले. पूर्णपणे कलाक्षेत्रावर निर्भर असलेल्या यशने गेल्याच वर्षी ड्रम खरेदी केला होता. मात्र, त्यानंतर लागलीच कोरोनाचा उद्रेक झाला आणि देशभरात टाळेबंदी लागू झाली. या काळात इतर क्षेत्रांप्रमाणेच संपूर्ण कलाक्षेत्रही स्तब्ध झाले होते. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर कलाक्षेत्राला नवचेतना मिळणार तोच पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आणि पुन्हा टाळेबंदी लागू झाली. याच विवंचनेत उत्पन्नाची साधन बंद पडली आणि इन्स्टाॅलमेंट देणे अशक्य झाल्याने, त्याच नैराश्येत यशने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. गुरुवारी दुपारी २ वाजता त्याने आपल्या घरीच डास मारण्याचे औषध प्राशन करत आत्महत्येचा निर्णय घेतला. मात्र, कुटुंबीयांनी त्याला तत्काळ नजीकच्या इस्पितळात दाखल केले. आता तो धोक्याबाहेर आहे. मात्र, त्याने उचललेल्या या पावलाने कलाक्षेत्रात खळबळ उडाली आहे.
------------
कलाक्षेत्राला सरकारने संजीवनी द्यावी - पी. कुमार
उत्तम ड्रमवादक असलेल्या यशने हे अत्यंत टोकाचे पाऊल उचलले. आता तो धोक्याबाहेर आहे. पूर्णवेळ कलाक्षेत्रावर निर्भर असलेल्या कलावंतांची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. पहिल्या टाळेबंदीने कलाक्षेत्र पार कोलमडले आहे. त्यातून बाहेर निघण्याचे प्रयत्न सुरू असतानाच पुन्हा एकदा टाळेबंदी लागू झाल्याने कलावंतांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट झाला आहे. अशी वेळ कोणत्याच कलावंतांवर येऊ नये, यासाठी सरकारने कलाक्षेत्राला संजीवनी देण्याचा प्रयत्न करावा, अशी भावना ऑस्कर संगीत संस्थेचे अध्यक्ष पी. कुमार यांनी व्यक्त केली.
..............